परळी वैजनाथ तालुक्यातील मलकापूर येथील गट क्रमांक 332/1 मधील शेतात जाणार्या रस्त्यावर झालेल्या कथित अतिक्रमणाची तहसील प्रशासनाने गंभीर दखल घेतली

परळी वैजनाथ तालुक्यातील मलकापूर येथील गट क्रमांक 332/1 मधील शेतात जाणार्या रस्त्यावर झालेल्या कथित अतिक्रमणाची तहसील प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात स्थानिक महसूल अधिकारी व गावचे पोलिस पाटील यांच्यावर निष्पक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत अर्जदारांनी बाहेरील तालुक्यातील अधिकार्यांकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हेळंब येथील रहिवासी कोंडीबा माणिक आंधळे व इतर शेतकर्यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात मलकापूर गावातील काही व्यक्तींनी गायरान जागेवर गोठा उभारून शेतात जाणारा रस्ता अडविल्याची तक्रार केली होती. या अतिक्रमणामुळे शेतीची कामे करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत असून शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची दखल घेत तहसील कार्यालयाने 3 जून 2026 रोजी मंडळ अधिकारी, परळी तसेच तलाठी सज्जा परळी वैजनाथ ग्रामीण यांना पत्र पाठवून प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. शासन निर्णयानुसार शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयास सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तहसील प्रशासनाच्या या आदेशामुळे संबंधित प्रकरणातील चौकशीला गती मिळणार असून शेतरस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून अतिक्रमणाविरोधात कारवाई होण्याची अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी परळी तसेच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली आहे. शेतकर्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग कायम खुला राहावा आणि कोणालाही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे.
स्थानिक अधिकार्यांवर अविश्वास
या प्रकरणात गावचे पोलिस पाटील, मंडळ अधिकारी आणि तलाठी प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप अर्जदार कोंडीबा माणिक आंधळे यांनी केला आहे. संबंधित अतिक्रमणाशी काही स्थानिक घटकांचा संबंध असल्यामुळे कारवाई टाळली जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. महसूल प्रशासनातील स्थानिक अधिकार्यांवर आमचा विश्वास राहिलेला नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व कार्यवाही करण्यासाठी इतर तालुक्यातील स्वतंत्र अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी. आमचा शेतात जाण्याचा रस्ता तातडीने खुला करून न्याय द्यावा, अशी मागणी कोंडीबा माणिक आंधळे यांनी केली आहे.

COMMENTS