मुंबई: पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील पार्कसाईट परिसरात गुरुवारी पहाटे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्
/lokshahi-eng/media/media_files/2026/04/30/crime-2026-04-30-10-27-26.png)
मुंबई: पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील पार्कसाईट परिसरात गुरुवारी पहाटे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या कारणावरून सुरू झालेला कौटुंबिक वाद हिंसक वळणावर गेला. या घटनेत एका व्यक्तीचा आणि त्यांच्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून पत्नी व धाकटा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विक्रोळीतील राहुलनगर परिसरात विश्वकर्मा कुटुंब एकत्र राहत होते. कुटुंबातील चार सख्खे भाऊ एकाच घरात वास्तव्यास होते. त्यापैकी काही जण घराच्या वरच्या मजल्यावर राहत होते. पहाटेच्या सुमारास सुनील विश्वकर्मा (वय ४०) यांनी घरात मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यामुळे त्यांचे भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी आवाज कमी करण्यास सांगितले. यावरून तिघांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूप गंभीर मारामारीत झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर सुरेंद्र आणि सूरज यांनी धारदार शस्त्रांच्या साहाय्याने सुनील विश्वकर्मा यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला त्यांचा १४ वर्षांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि धाकटा मुलगा विवान विश्वकर्मा हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराचा ताबा घेतला. घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून तज्ज्ञ तपास पथकानेही पाहणी केली आहे. या प्रकरणी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे.
हत्येमागील कारणाचा शोध सुरू प्राथमिक तपासात मोठ्या आवाजातील गाण्यांवरून वाद झाल्याचे समोर आले असले, तरी एवढ्या गंभीर स्वरूपाच्या हल्ल्यामागे केवळ हेच कारण असावे, अशी शक्यता कमी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कुटुंबातील जुने वाद, मालमत्तेचा प्रश्न किंवा अन्य काही कारणे या घटनेला कारणीभूत होती का, याचाही तपास सुरू आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे विक्रोळी परिसरात मोठी खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS