नांदेड : शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यामागील सुधाकरराव टाक धानोरकर यांच्या मालकीच्या जागेवर महापालिकेकडून प्रस्तावित रस्त्या

नांदेड : शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यामागील सुधाकरराव टाक धानोरकर यांच्या मालकीच्या जागेवर महापालिकेकडून प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठी जेसीबीच्या सहाय्याने जमीन सपाटीकरण सुरू करण्यात आले. या कारवाईला धानोरकर कुटुंबीयांनी तीव्र आक्षेप घेतल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी रस्त्याच्या कामासाठी जमीन सपाटीकरण करत असताना धानोरकर कुटुंबीयांनी संबंधित जागेच्या मालकीचा मुद्दा उपस्थित करत काम थांबविण्याची मागणी केली. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला आणि काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. दरम्यान, परिस्थिती बिघडू नये म्हणून संबंधित अधिकार्यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणात महापालिकेचा दावा आणि धानोरकर कुटुंबीयांची भूमिका परस्परविरोधी असल्याचे समोर येत असून, संबंधित जागेचा व रस्त्याच्या प्रस्तावाचा सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर आढावा घेण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत महापालिका प्रशासन आणि धानोरकर कुटुंबीयांची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

COMMENTS