श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात भारत सरकारच्या 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जनज

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात भारत सरकारच्या ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात श्रीगोंदा येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. विकास सोमवंशी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचा प्रेरणादायी संदेश दिला. विद्यार्थ्यांनी जीवनात कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला बळी न पडता ज्ञान, कष्ट, चांगले विचार आणि यश यांचीच नशा करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.मार्गदर्शन करताना डॉ. सोमवंशी म्हणाले, “नशा करायचीच असेल तर चांगल्या विचारांची, ज्ञानाची, कष्टाची आणि यशाची नशा करा.” आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत तरुणांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य तसेच अमली पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, मानसिक आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम आणि कुटुंब व समाजात निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांवर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.व्यसनामुळे व्यक्तीचे आरोग्य, शिक्षण, करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येते. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात, गुन्हेगारीला चालना मिळते आणि समाजाच्या विकासालाही खीळ बसते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने व्यसनांपासून कायम दूर राहून निरोगी, सकारात्मक आणि जबाबदार जीवनशैली स्वीकारावी, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश साळवे यांनी व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि अशास्त्रीय गोष्टींच्या प्रभावाखाली न जाता विवेकनिष्ठ, वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध विचारसरणी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. डॉ. श्रीकांत थोरात, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय फटे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप दरेकर यांनी केले, तर प्रा. बापू मांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS