नांदेड : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने सायकल ट्रॅक हटवून रस्ते रुंद करण्याचा निर्णय घेतला; मात्र हा निर्णय प्रत्यक्षात पू

नांदेड : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने सायकल ट्रॅक हटवून रस्ते रुंद करण्याचा निर्णय घेतला; मात्र हा निर्णय प्रत्यक्षात पूर्णपणे फसलेला दिसत आहे. रस्ते रुंद झाले, पण अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि प्रशासनाच्या ढिसाळ अंमलबजावणीमुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे. परिणामी, नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी वाहतूक अराजकतेचा सामना करावा लागत आहे.
नांदेड शहराचा विस्तार वेगाने झाला, मात्र त्यानुसार पायाभूत सुविधांचा विकास झाला नाही. 2008 साली गुरु-ता-गद्दी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेले सायकल ट्रॅक हे त्या काळात वाहतुकीसाठी शिस्तबद्ध उपाय मानले जात होते. परंतु, कालांतराने हेच ट्रॅक अतिक्रमणांचे केंद्र बनले. त्यामुळे मनपाने ते हटवून रस्ते रुंद केले. पण, अतिक्रमणावर कारवाई न झाल्याने आणि नियमांची अंमलबजावणी ढिसाळ राहिल्याने या उपाययोजनेचा काहीच उपयोग झाला नाही. वजीराबाद, कलामंदिर, शिवाजीनगर, श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नर, राजकॉर्नर, नाईक चौक, छत्रपती चौक, पावडेवाडी नाका या भागांमधून जाणार्या रस्त्यावर वावरताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.. पण आज तोच मार्ग वाहतूक कोंडीचा सर्वात मोठा अड्डा बनला आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहनांची रांग लागलेली असते, तर सायंकाळी तर परिस्थिती पूर्णतः हाताबाहेर जाते. देगलूर नाका परिसरात तर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. मुथा चौकात वाहनधारकांची बेशिस्तपणा स्पष्ट दिसून येतो. तिरंगा चौकाकडून येणारी वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात, तर शिवाजी चौकाच्या दिशेने जाणार्या वाहनांनी तर भर रस्ताच व्यापलेला असतो. यामुळे मागील वाहनांची लांबच लांब रांग लागते आणि संपूर्ण वाहतूक ठप्प होते. या सगळ्या परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अतिक्रमणाचा. रस्त्याच्या दुतर्फा फळ विक्रेते, हातगाडे, छोटे व्यावसायिक यांना जणू प्रशासनाने मोकळे रान दिले आहे. महापालिकेने हॉकर्स झोन, नो-हॉकर्स झोन, पार्किंग स्पॉट किंवा पे-अँड-पार्क यासारख्या मूलभूत उपाययोजनांची अंमलबजावणीच केलेली नाही. ऑटो थांबे निश्चित नसल्याने रस्त्याच्या मध्यभागीच रिक्षा उभ्या राहताना दिसतात. शहरातील व्यापारी संकुलांची स्थितीही तितकीच गंभीर आहे. बहुतांश ठिकाणी पार्किंगची सोय नसल्यामुळे ग्राहकांची वाहने थेट रस्त्यावरच उभी राहतात. दुकानासमोर माल मांडण्याची पद्धतही सर्रास सुरू आहे. फुटपाथ हे पादचार्यांसाठी नसून दुकानांच्या विस्तारासाठी वापरले जात आहेत. परिणामी, पादचारी रस्त्यावर उतरतात आणि वाहतूक आणखी विस्कळीत होते. विशेष म्हणजे, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पूर्वी सम-विषम पार्किंग, सायकल ट्रॅक, फुटपाथ यासारखे उपाय करण्यात आले होते. पण त्यांची अंमलबजावणी टिकवून ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरले. आज परिस्थिती अशी आहे की, रस्ते रुंद असले तरी त्यावर चालण्यासाठी जागा नाही. वाहतूक विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते; मात्र ती तात्पुरती आणि दिखाऊ ठरत आहे. शिस्तभंग करणार्यांवर कठोर कारवाई न झाल्याने नियमांचे उल्लंघन सर्रास सुरू आहे. नागरिकांमध्येही वाहतूक नियमांविषयी उदासीनता दिसून येते. या संदर्भात सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी स्पष्ट केले की, वाहतूक समस्या केवळ पोलिसांनी सोडवणे शक्य नाही. महापालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न केल्यासच या समस्येवर तोडगा निघू शकतो. मात्र, प्रत्यक्षात पाहता जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसते. ठोस नियोजन, कठोर अंमलबजावणी आणि नागरिकांची शिस्त या त्रिसूत्रीशिवाय नांदेडच्या वाहतुकीला मार्ग सापडणे कठीण आहे. अन्यथा, सायकल ट्रॅक काढून रस्ते रुंद करण्यासारखे निर्णय केवळ कागदोपत्रीच राहतील आणि नागरिकांना वाहतूक कोंडीच्या नरकयातनेतून सुटका होणार नाही.

COMMENTS