अकोले : तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत देशी-विदेशी दारूसह दोन मो

अकोले : तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत देशी-विदेशी दारूसह दोन मोबाईल, रोख रक्कम, दुचाकी आणि कार असा एकूण १० लाख ५२ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चौघांविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ४ ऑगस्ट रोजी अकोले पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी ब्राम्हणवाडा-बोटा मार्गावरील स्वामी समर्थ अक्वाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये अनिष बाबू पटेल (वय ५८) हा बेकायदेशीरपणे देशी-विदेशी मद्याची विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अनिष पटेल, नदीम याकुब पटेल (वय ३१) आणि नाजीम पटेल (वय ३१, तिघे रा. ब्राम्हणवाडा) यांना ताब्यात घेतले.या कारवाईत ४९ हजार १७० रुपयांच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या, ५१ हजार ३३० रुपयांचे दोन मोबाईल, ६०० रुपये रोख, एक लाख रुपयांची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी आणि आठ लाख ५० हजार रुपये किमतीची हुंडाई कार असा एकूण १० लाख ५१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, याच कारवाईदरम्यान ब्राम्हणवाडा येथील एका हॉटेलमध्ये उत्तम आनंद शिंदे हा देशी दारूची बेकायदेशीर विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून एक हजार ७९० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्धही अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलिस अंमलदार गणेश लोंढे, राहुल डोके, योगेश कर्डिले आणि आदिनाथ पाखरे यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास अकोले पोलिस करीत आहेत.

COMMENTS