कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञान यांचा समन्वय साधून राज्यातील पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व समृद्ध करावा, असे आवाहन पशुसंवर्ध

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञान यांचा समन्वय साधून राज्यातील पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व समृद्ध करावा, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
’कारगिल’ कंपनीने ’सिजेंटा फाउंडेशन इंडिया’ आणि ’डिजिटल ग्रीन इंडिया’ यांच्या भागीदारीत अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू केलेल्या एकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागाचे सचिव एन. रामास्वामी, कारगिल इंडियाचे अध्यक्ष तथा कारगिल निमल न्यूट्रिशन अँड हेल्थचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक रविंदर बलाईन, डिजिटल ग्रीन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी भसीन आणि सिजेंटा फाउंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम बोराडे उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुपालक शेतकरी आणि इतर भागीदार ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले. पंकजा मुंडे म्हणाल्या की, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय हा ग्रामीण जीवनमानाचा कणा असून शासनाचा भर नेहमीच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर राहिला आहे. कारगिल, सिजेंटा फाउंडेशन आणि डिजिटल ग्रीन यांचा संयुक्त उपक्रम ‘विकसित महाराष्ट्र’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनांना बळ देणारा ठरेल. तंत्रज्ञान, ‘फार्मरचॅट’सारखे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल मार्गदर्शन आणि ‘पशु आरोग्य मित्र’ या फिरत्या पशुवैद्यकीय सेवेमुळे अहिल्यानगरमधील हजारो शेतकर्यांना थेट लाभ मिळणार आहे. तसेच ‘पशु सखी’च्या माध्यमातून महिलांचा वाढता सहभाग ग्रामीण महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, राहता आणि श्रीरामपूर तालुक्यातील 26 गावांमधील तीन हजारांहून अधिक शेतकर्यांना ‘पशु आरोग्य मित्र’ मोबाईल व्हेटर्नरी व्हॅनद्वारे पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे. याशिवाय 120 गावांतील सुमारे पाच हजार शेतकर्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल सल्ला व क्षमता विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. उपक्रमासाठी दोन अत्याधुनिक फिरते पशुवैद्यकीय दवाखाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या वाहनांमध्ये आधुनिक निदान साधने, औषधे तसेच लसींसाठी कोल्ड-चेन सुविधा उपलब्ध असून त्यामुळे शेतकर्यांच्या दारात वेळेवर उपचार मिळून जनावरांचा मृत्यूदर कमी करण्यास मदत होणार आहे. ‘डिजिटल ग्रीन’मार्फत ‘पशु सखी’ आणि पॅरा-व्हेट्सना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षित करण्यात येणार असून ते गावोगावी जाऊन पशुपोषण, वासरांची काळजी, स्वच्छता आणि दुग्ध व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करतील. तसेच ‘फार्मरचॅट’ या एआय-आधारित आवाज प्रणालीद्वारे स्थानिक भाषेत जनावरांचे आजार, उपचार आणि शासकीय योजनांची माहिती शेतकर्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. कारगिल इंडियाचे अध्यक्ष रविंदर बलाईन यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत, या उपक्रमामुळे दुग्धव्यवसायाची परिसंस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. डिजिटल ग्रीन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी भसीन आणि सिजेंटा फाउंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम बोराडे यांनीही हा प्रकल्प शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबतच हवामान-अनुकूल शेतीला चालना देणारा ठरेल, असे सांगितले.

COMMENTS