परळी वै.: परळी वैजनाथ तालुक्यातील टोकवाडी-नागापूर-मांडेखेल-गडदेवाडी या सात वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर अखेर ग्रामस्थांचा

परळी वै.: परळी वैजनाथ तालुक्यातील टोकवाडी-नागापूर-मांडेखेल-गडदेवाडी या सात वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर अखेर ग्रामस्थांचा संताप उफाळून आला. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, पावसामुळे साचलेले पाणी आणि वारंवार होणारे अपघात यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बहादूरवाडी फाटा येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात परिसरातील ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, दूध उत्पादक, वाहनचालक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. टोकवाडी, डाबी, बहादूरवाडी, दोनापूर, नागापूर, वानटाकळी, मांडेखेल, अस्वलबा, माळहिवरा, गोपाळपूर, नागपिंपरी, बोधेगाव आणि गडदेवाडी या गावांतील हजारो नागरिक दररोज या मार्गाने प्रवास करतात. मात्र, रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने प्रत्येक प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर गंभीर आरोप करत, अनेकदा पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचे सांगितले. रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचाही आरोप करण्यात आला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून आठ दिवसांत रस्त्याची तातडीने डागडुजी सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, दिलेल्या मुदतीत प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तम माने आणि तालुकाध्यक्ष बाबा शिंदे यांनी भेट देत ग्रामस्थांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी रमेश ढाकणे, राजेशाम मुंडे, कोंडीबा घाडगे, अमोल आजले, चंद्रकांत मुंडे, बबलू मुंडे, वैजनाथ मुंडे, बालासाहेब गुट्टे, बाळा गायके, बळीराम आघाव, समाधान राख, सोपान काचगुंडे, नागनाथ सावजी, किरण सोळंके, कैलास सोळंके, शिवाजी नागरगोजे, कल्याण नानावटे, तुकाराम गडदे, मुरलीधर नागरगोजे, विष्णू हांगे, सुरेश काचगुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उत्तम माने, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष : टोकवाडी-गडदेवाडी रस्त्याची दुरवस्था ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे प्रतीक आहे. ग्रामस्थांच्या रास्त आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर ग्रामस्थांसोबत अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल. रमेश ढाकणे व राजेशाम मुंडे, आंदोलनकर्ते : गेल्या सात वर्षांपासून या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून खड्डे आणि पावसाच्या पाण्यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या मुदतीत काम सुरू झाले नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करून तीव्र लढा उभारला जाईल.

COMMENTS