मुंबई: राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत केले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पावसामुळे

मुंबई: राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत केले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
नाशिक शहर आणि धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर आला आहे. सततच्या पावसाने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून रामकुंड परिसरातील सर्व मंदिरे आणि रामसेतू पूल पाण्याखाली गेले आहेत. प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे.
हवामान विभागाने पुणे घाटमाथ्यासाठी अतिधोक्याचा (रेड अलर्ट) इशारा, तर पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांसाठी उच्च सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक सखल भाग पाण्याखाली गेले असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. काही प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने सुमारे १५ ते १६ गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. सूर्या नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या सुमारे ६५ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे डहाणू-विरार मार्गावरील उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून काही फेऱ्या उशिराने धावत आहेत.
मुंबई व उपनगरांत रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. विहार व तुळशी तलावांनंतर तानसा जलाशयही पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. सातपैकी तीन जलाशय पूर्ण भरले असून एकूण जलसाठा ६० टक्क्यांहून अधिक झाला आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाईची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही गेल्या काही दिवसांत चांगल्या पावसाची नोंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
शनिवारनंतर पावसाचा जोर कमी होणार
हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रातील कमी दाबाचा प्रभाव हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे आषाढी एकादशीपर्यंत राज्यातील अनेक भागांत पावसाचा प्रभाव कायम राहू शकतो. त्यानंतर म्हणजेच २५ जुलै नंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाला काही प्रमाणात विश्रांती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

COMMENTS