नांदेड: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे मागील सहा महिन्यांपासून पूर्णवेळ महासंचालकाची नियुक्ती न झाल्यामुळे स

नांदेड: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे मागील सहा महिन्यांपासून पूर्णवेळ महासंचालकाची नियुक्ती न झाल्यामुळे संस्थेची विविध प्रशासकीय व शैक्षणिक कामे रखडली असून त्याचा फटका विद्यार्थी आणि लाभार्थ्यांना बसत असल्याचा आरोप बार्टीचे तज्ञ मार्गदर्शक (रमाई प्रकल्प) तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तलवारे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांकडे निवेदन सादर करून तातडीने पूर्णवेळ महासंचालक नियुक्त करण्याची मागणी केली आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, बार्टीच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सध्या समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ (मुंडे) यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे एकूण तीन महत्त्वाच्या पदांचा कार्यभार असल्याने बार्टीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून अनेक महत्त्वाच्या योजना आणि प्रशासकीय प्रक्रिया रखडल्या आहेत. तलवारे यांच्या म्हणण्यानुसार, स्वाधार शिष्यवृत्ती, अभिछात्रवृत्ती (फेलोशिप), विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचा निधी, बैठकींचे मानधन, दौर्यांची देयके तसेच इतर प्रशासकीय मंजुरीची कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी, संशोधक आणि प्रशिक्षणार्थींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बार्टीच्या कामकाजाला गती देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन वरिष्ठ व पात्र अधिकार्याची पूर्णवेळ महासंचालक म्हणून तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सिद्धार्थ तलवारे यांनी शासनाकडे केली आहे. संस्थेतील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS