पुणे: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्याची हाक देत भारतीय जनतेत राष्ट्रीय चेतना जागवली आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भक्कम पाया रचला, असे प्

पुणे: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्याची हाक देत भारतीय जनतेत राष्ट्रीय चेतना जागवली आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भक्कम पाया रचला, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी केले. ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांचा गौरव करताना त्यांनी टिळकांच्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण केले. देशाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अजित डोव्हाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्यात बोलताना मंत्री अमित शाह म्हणाले, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, ही घोषणा केवळ स्वातंत्र्यलढ्याची हाक नव्हती, तर संपूर्ण राष्ट्राला जागवणारी प्रेरणा होती. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या उपक्रमांतून टिळकांनी समाजाला एकत्र आणत सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना रुजवली. स्वतंत्र भारताचा मार्ग याच विचारांतून पुढे जाणार असल्याची दूरदृष्टी त्यांनी त्याच काळात दाखवून दिली.”
शाह यांनी टिळकांच्या पत्रकारितेचाही गौरव केला. केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांतील त्यांच्या निर्भीड लेखणीमुळे तत्कालीन इंग्रज सत्तेलाही धास्ती वाटत होती. भारताच्या आत्म्याला शब्दरूप देण्याचे कार्य टिळकांनी केले, असे त्यांनी नमूद केले. टिळकांनी स्वराज्याबरोबरच आत्मनिर्भरतेचाही विचार मांडला होता. भगवद्गीतेचा जीवनाशी संबंध जोडत त्यांनी शिक्षण, स्वाभिमान आणि स्वावलंबन यांचा संदेश दिला. त्यांचे विचार आणि लेखन आजच्या पिढीसाठीही तितकेच प्रेरणादायी असून त्यांची लेखणी कधीही कालबाह्य होणार नाही, असे शाह म्हणाले.
अजित डोव्हाल यांना पुरस्कार प्रदान करण्याची संधी मिळणे हे स्वतःचे भाग्य असल्याचे सांगताना अमित शाह म्हणाले की, आयुष्यभर राष्ट्रसेवेसाठी वाहून घेतलेल्या व्यक्तीचा सन्मान करणे हा अभिमानाचा क्षण आहे. गुजरातमध्ये दहशतवादी स्फोटांच्या तपासादरम्यान डोव्हाल यांचे मार्गदर्शन लाभल्याच्या आठवणीही त्यांनी यावेळी सांगितल्या.
डोव्हाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेला नवी दिशा दिली: मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अजित डोव्हाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेला नवे बळ दिल्याचे सांगितले. लोकमान्य टिळकांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार राष्ट्रहितासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या व्यक्तीलाच मिळणे योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यलढ्यात सामान्य जनतेला सहभागी करून घेण्यात टिळकांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
डोव्हाल हेच खरे धुरंधर: उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित डोव्हाल यांच्या धाडसी आणि प्रभावी कार्याचा गौरव करत त्यांना ‘खरे धुरंधर’ असे संबोधले. लोकमान्य टिळकांच्या नावाशी डोव्हाल यांचे नाव जोडले जाणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
देशसेवेचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व: उपमुख्यमंत्री पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित डोव्हाल यांनी देशाच्या सीमासुरक्षा आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे सांगितले. कठीण परिस्थितीत त्यांनी दाखवलेले धैर्य आणि राष्ट्रसेवेची भावना प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
काँग्रेसच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. खबरदारीचा उपाय म्हणून युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून प्रमुख ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

COMMENTS