नांदेड: देशातील शिक्षण व्यवस्थेत सातत्याने उघड होत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि विविध शासकीय भरती परीक्षांती

नांदेड: देशातील शिक्षण व्यवस्थेत सातत्याने उघड होत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि विविध शासकीय भरती परीक्षांतील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला राज्यभरातील कवी, शिक्षक, साहित्यिक, कलावंत आणि विचारवंतांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
प्रसिद्ध साहित्यिक, शिक्षक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असून, त्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरत आहे. या गंभीर परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्थेत मूलभूत सुधारणा कराव्यात, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित जबाबदार मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात विद्यार्थ्यांच्या वाढत्या नैराश्याचाही उल्लेख करण्यात आला असून, भवितव्याच्या चिंतेतून अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची बाब अत्यंत वेदनादायी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे हजारो विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आंदोलनावर कथितपणे अश्रुधूराचा वापर आणि लाठीमार करण्यात आल्याचा आरोप करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईबाबत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असून, अन्यायाविरोधात आवाज उठविणे हे प्रत्येक संवेदनशील नागरिकाचे कर्तव्य असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांची शासनाने तातडीने दखल घेऊन शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या निवेदनावर राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवी, शिक्षक, कलावंत आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी स्वाक्षर्या करून विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यात दत्ता भगत, कौतिकराव ठाले-पाटील, अनुराधा पाटील, डॉ. सूर्यनारायण रणसुभे, श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीकांत साहेबराव देशमुख, सदानंद देशमुख, प्रवीण बांदेकर, शेषराव मोहिते, प्रल्हाद लुलेकर, अतुल पेठे, दगडू लोमटे, पुरुषोत्तम सदाफुले, विजयालक्ष्मी वानखेडे, रामदास बोकारे, आनंद कदम यांच्यासह राज्यभरातील शंभरहून अधिक साहित्यिक, शिक्षक, कलावंत आणि विचारवंतांचा समावेश आहे.

COMMENTS