कृषी विभाग, भारत सरकार व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जून ते 15 जून या कालावधीत राबविण्यात येणार्या खेती बचाव अभियान च

कृषी विभाग, भारत सरकार व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जून ते 15 जून या कालावधीत राबविण्यात येणार्या खेती बचाव अभियान ची सुरुवात 2 जून रोजी राडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात शेतकर्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामान बदलाच्या परिस्थितीत पीक व्यवस्थापन तसेच शाश्वत शेती पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले कृषी विद्यावेत्ता डॉ. अरुण गुट्टे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत शेतकर्यांनी माती परीक्षण अहवालानुसार खतांचा संतुलित वापर करावा, असे आवाहन केले. रासायनिक खतांसोबत हिरवळीची खते, एकात्मिक पोषण व्यवस्थापन(आयएनएम) सेंद्रिय व जैविक उत्पादनांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढते आणि उत्पादन खर्चात बचत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अल निनोच्या संभाव्य प्रभावाची माहिती देत बदलत्या हवामान परिस्थितीत सोयाबीन पिकाचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. सोयाबीनच्या सुधारित वाणांची निवड, बीबीएफ (रुंद सरी-वरंबा) पद्धतीने पेरणी, कमी तसेच अतिवृष्टीच्या परिस्थितीत या पद्धतीचे फायदे, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड व रोग व्यवस्थापन तसेच लागवडीपासून काढणीपर्यंतच्या सर्व बाबींवर त्यांनी शास्त्रीय माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी विजयकुमार पवार यांनी अल निनोचा खरीप हंगामावर होणारा परिणाम आणि त्यावर मात करण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. खरीप पेरणीपूर्व मोहिमेच्या माध्यमातून शेतकर्यांपर्यंत आवश्यक तांत्रिक माहिती पोहोचविण्याचे काम कृषी विभाग सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक कृषी अधिकारी किशोर अडगळे यांनी तालुक्यातील खरीप हंगामाचे नियोजन, सोयाबीन, फळबाग व ऊस क्षेत्राची माहिती, विविध पिकांच्या क्षेत्रनिहाय नियोजनासह बियाण्यांची मागणी व उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती दिली. यंदाच्या हंगामासाठी शेतकर्यांना दर्जेदार बियाणे व कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने केलेल्या तयारीची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच बी. एस. सूर्यवंशी यांनी फार्मर कप स्पर्धा आणि एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) याबाबत मार्गदर्शन करताना शेतकर्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करून उत्पादनवाढ साध्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच प्रशांत पाटील यांनी भूषविले. यावेळी निळू नाना गंगणे, नाना पाटील, सुहास पाटील यांच्यासह रॉयल शेतकरी गटाचे सदस्य, झाशीची राणी महिला शेतकरी गटातील महिला तसेच गावातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेती बचाव अभियानाच्या माध्यमातून शेतकर्यांना हवामान बदल, अल निनोचा प्रभाव, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धती याबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याने उपस्थित शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे खरीप हंगामासाठी शेतकरी अधिक सज्ज होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS