बीड - क्रांतिदिनी 9 ऑगस्ट 1989 रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धापन

बीड – क्रांतिदिनी 9 ऑगस्ट 1989 रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धापनदिनानिमित्त बीड शाखेच्या वतीने शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ ‘गीत जागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अंनिसचे पदाधिकारी, समविचारी पक्ष-संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत विविध जनजागृतीपर व स्फूर्तीदायी चळवळीची गीते सादर केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी विवेक वाहिनीच्या राज्य कार्यवाह प्राचार्य डॉ. सविता शेटे, कॉ. नामदेव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य कॉ. डी. जी. तांदळे, शाखाध्यक्ष प्रा. विजय घेवारे, व्यसनमुक्ती विभागप्रमुख बाजीराव ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता प्रभाळे, शुभांगी कुलकर्णी, संपादक शेखर कुमार, कौशल्या बावणे आदींनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ. सविता शेटे, कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. डी. जी. तांदळे आणि शेखर कुमार यांनी भोंदूगिरी, भ्रामक फलज्योतिष्य आणि कर्मकांडाच्या माध्यमातून होणारे जनतेचे शोषण रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची आवश्यकता स्पष्ट केली. तसेच जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवादी विचार रुजविण्याचे आवाहन केले.
यावेळी ‘अभिवादन करून तुम्हां डॉ. दाभोलकर, जोमाने पुढे नेऊ चळवळ’, ‘बुद्ध, कबीर, भीमराव, फुले या भूमीवर जन्मले’, ‘चला गड्यांनो पाऊल टाकू पुढे, उखडून टाकू अंधश्रद्धेची मुळे’, ‘आम्ही प्रकाशबीजे रुजवित चाललो’ आदी गीते सादर करण्यात आली. विधिज्ञ कॉ. भीमराव चव्हाण यांनी साने गुरुजींचे ‘आता उठवू सारे रान’ हे गीत सादर करून उपस्थितांना उत्स्फूर्त सहभागासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी विद्यार्थी, शिक्षक व ज्येष्ठ नागरिकांना डॉ. दाभोलकर, अंनिस, संविधान तसेच ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम-2013’ यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. योग्य उत्तरे देणाऱ्या सहभागींना उपयुक्त पुस्तके भेट देण्यात आली. ‘हम होंगे कामयाब एक दिन’ या गीताच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय तांदळे, बाजीराव ढाकणे, नितीन जायभाये, पाशा भाई पटेल यांनी नियोजन केले. किरण घाटगे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ नाईकवाडे, अशोक भाऊ, रविंद्र मुंडे, शहादेव मिसाळ यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. अभियानाची गरज, प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राचार्य डी. जी. तांदळे यांनी केले, तर कॉ. भीमराव चव्हाण यांनी आभार मानले.

COMMENTS