पिंपळनेर: आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा पार पडल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाने तृप्त झालेले लाखो वारकरी, भाविक आणि भक्तजन आता सोलापूर, बीड-पर

पिंपळनेर: आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा पार पडल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाने तृप्त झालेले लाखो वारकरी, भाविक आणि भक्तजन आता सोलापूर, बीड-परळी तसेच पिंपळनेर महामार्गावरून आपापल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत महामार्गावर बस, ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, कार, ट्रॅव्हल्स, दुचाकी आणि इतर वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आलेले भाविक नामघोष, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तिभावाचा अमूल्य ठेवा मनात साठवून परतीच्या प्रवासाला लागले आहेत. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनानंतर त्यांच्या चेहर्यावर समाधान, डोळ्यांत भक्तिभाव आणि ओठांवर हरिनामाचा अखंड गजर दिसून येत आहे.
महामार्गावरील विविध ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेले वारकरी, कुटुंबासह प्रवास करणारे भाविक आणि विठ्ठलनामात तल्लीन झालेले युवक-युवती यामुळे या मार्गावर वारीचा उत्साह अद्यापही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. “यंदाची आषाढी वारी आयुष्यभर स्मरणात राहील,” अशी भावना मैदा पोखरीचे वारकरी भीष्मा काळे, रामेश्वर काळे, वसंत बोगाने आणि भास्कर भोंगाने यांनी व्यक्त केली.
आषाढी एकादशीचा हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव नसून भक्ती, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. परतीच्या प्रवासातही लाखो भाविकांच्या चेहर्यावर झळकणारा आनंद आणि विठ्ठलभक्तीची अनुभूती हीच या वारीची खरी ओळख ठरत आहे.

COMMENTS