Homeताज्या बातम्या

नीट प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात १३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल; सीबीआयकडून तब्बल २० हजार पानांचा तपशील न्यायालयात सादर

नवी दिल्ली: वैद्यकीय पदवीपूर्व प्रवेश परीक्षेशी (NEET) संबंधित कथित प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण संस्थेने (CBI) तपासाला महत्त्व

एअरबॅगचा अनपेक्षित स्फोट ठरला जीवघेणा; मीरा रोड परिसरात २५ वर्षीय कार विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू
वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिरचा दुहेरी प्रथम क्रमांक
’शहराचा तिसरा डोळा’ मिटला; बंद सीसीटीव्हींमुळे सुरक्षेची हमीच संशयाच्या भोवर्‍यात

नवी दिल्ली: वैद्यकीय पदवीपूर्व प्रवेश परीक्षेशी (NEET) संबंधित कथित प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण संस्थेने (CBI) तपासाला महत्त्वाचे वळण देत १३ आरोपींविरुद्ध सुमारे २० हजार पानांचे सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणामुळे देशभरात निर्माण झालेल्या खळबळीनंतर तपास यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर पुरावे, साक्षी आणि तांत्रिक अहवाल न्यायालयासमोर मांडले आहेत.

सुनावणीदरम्यान केंद्रीय अन्वेषण संस्थेने न्यायालयाला सांगितले की, आरोपपत्रासोबत जोडण्यात येणाऱ्या परिशिष्ट कागदपत्रांची छाननी आणि संगणकीय प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयाने आरोपपत्राची नोंद घेत उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये कागदपत्रांची सविस्तर यादी, साक्षीदारांचे जवाब तसेच जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा तपशील समाविष्ट आहे.

अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींविरुद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात, पुरावे नष्ट करणे यांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४ अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

उच्च शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर १२ मे २०२६ रोजी या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आठ सायबर न्यायवैद्यक तज्ज्ञांसह ७२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, दिल्लीसह विविध राज्यांतील ९२ ठिकाणी छापे टाकून भ्रमणध्वनी, संगणक, डिजिटल साधने, कागदपत्रे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. तपासादरम्यान डिजिटल विश्लेषणाच्या आधारे संपूर्ण जाळ्याचा मागोवा घेण्यात आला.

या प्रकरणात राष्ट्रीय परीक्षा संस्थेशी (NTA) संबंधित रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांच्या तीन तज्ज्ञांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच काही मध्यस्थांनी प्रश्नपत्रिकेची माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, दोन प्रशिक्षण संस्थांशी संबंधित व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील सुनावणीत आणखी पुरावे व परिशिष्ट कागदपत्रे न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे.

३६० साक्षीदारांचे जवाब, शेकडो पुरावे

तपासादरम्यान सीबीआयने ३६० साक्षीदारांचे जवाब नोंदवले असून, आरोपपत्रासोबत ४२२ कागदपत्रे आणि ४३ भौतिक पुरावे जोडण्यात आले आहेत. तांत्रिक न्यायवैद्यक अहवाल, हस्ताक्षर तज्ज्ञांचे मत आणि शैक्षणिक तज्ज्ञांच्या विश्लेषणाच्या आधारे परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेतील काही भाग बाहेर पडल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

COMMENTS