मुंबई - दादर परिसर नेहमीच गर्दीने गजबजलेला असतो. शिवाजी पार्क, ऐतिहासिक शिवाजी मंदिर नाट्यगृह आणि आसपासच्या रहिवासी भागामुळे येथे दररोज शेकडो नाग

मुंबई – दादर परिसर नेहमीच गर्दीने गजबजलेला असतो. शिवाजी पार्क, ऐतिहासिक शिवाजी मंदिर नाट्यगृह आणि आसपासच्या रहिवासी भागामुळे येथे दररोज शेकडो नागरिक आणि ग्राहकांची वर्दळ असते. अशा सुरक्षित आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भागात स्टार मॉलमधील एका स्पामध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी ‘रिबेल थाई स्पा’वर अचानक धाड टाकून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी २५ ते ३० वयोगटातील सहा तरुणींची सुटका केली असून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये आशा परमार (महिला दलाल), साहिल पिल्लई (‘रिबेल थाई स्पा’चा मॅनेजर), कैलाश यादव आणि करण वर्धन यांचा समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक आत पोहोचताच तेथे सहा पीडित तरुणी आढळून आल्या. आरोपींनी स्पाच्या नावाखाली हे सेक्स रॅकेटचे जाळे उभे केले होते. अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नव्हता.
‘रिबेल थाई स्पा’च्या नावाखाली या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या तरुणी, महिला दलाल आणि स्पा मॅनेजर असे नेटवर्क उभे करण्यात आले होते. पण पोलिसांनी अचानक धाड टाकल्यानंतर तेथे २५ ते ३० वयोगटातील सहा तरुणी काम करत असल्याचे आढळले. पोलिसांनी या तरुणींची सुटका केली आहे. दादरसारख्या परिसरात असा व्यवसाय सुरु असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता पोलिसांच्या तपासातून या सगळ्याविषयी आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हा प्रकार नक्की किती दिवसांपासून सुरू होता आणि यात आणखी कोणाचे साटेलोटे आहे का? याचा सखोल तपास शिवाजी पार्क पोलीस करत आहेत.

COMMENTS