मुंबई - दूध, पनीर आणि इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात आता राज्य सरकार अत्यंत कठोर भूमिका घेण्याच्या तयार

मुंबई – दूध, पनीर आणि इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात आता राज्य सरकार अत्यंत कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. अशा असामाजिक घटकांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मकोका) अंतर्गत कारवाई केली जाण्याची दाट शक्यता असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला थेट व कडक निर्देश दिले आहेत. अन्न भेसळीचे प्रकार संघटित टोळ्यांमार्फत चालवले जात असल्याचे निष्पन्न झाल्याने, आरोपींवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) आढावा बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. अन्नपदार्थांमधील भेसळ हा केवळ साधा गुन्हा नसून अबालवृद्धांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे, असे सांगत लहान मुले दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करत असल्याने त्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अत्यंत गंभीर आहेत, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे अशा संघटित टोळ्यांवर कोणतीही नरमाई न दाखवता धडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एफडीएची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरात धडक धाडसत्र सुरू झाले आहे. या कारवाईमुळे बाजारातील भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांची आवक लक्षणीय घटली असून नियमबाह्य काम करणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेला सर्वसामान्यांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.

COMMENTS