Homeताज्या बातम्या

दिंडीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोन महिला जेरबंद; १.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बीड: बीड जिल्ह्यातील नगद नारायण महाराज नारायणगड येथे आयोजित करण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागि

शेळीचोर टोळीचा पर्दाफाश! १२ गुन्हे उघड, १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अहिल्यानगर ‘एलसीबी’ची धडक कारवाई
विद्यार्थी आंदोलनात लाठीचार्जचा आदेश कोणी दिला? खासदार राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्राद्वारे सवाल
नवरदेवाच्या वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला; संगमनेर तालुक्यातील सतेचीवाडी येथील वरातीत धुमाकूळ

बीड: बीड जिल्ह्यातील नगद नारायण महाराज नारायणगड येथे आयोजित करण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १ लाख १९ हजार ९९० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करून गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२६ रोजी नारायणगड येथे नगद नारायण महाराजांच्या दिंडी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. याच गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेनंतर पीडित महिलेने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीद्वारे संशयित महिलांचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना दोन महिलांबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे केशरबाई सुखदेव जाधव आणि संगिता विजय गायकवाड (दोन्ही रा. गांधीनगर पेठ, बीड) अशी आहेत. पोलिसांनी दोघींची कसून चौकशी केली असता त्यांनी दिंडीतील गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यातील १ तोळे २.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्याची अंदाजे किंमत १ लाख १९ हजार ९९० रुपये आहे, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेले दागिने पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर संबंधित फिर्यादीस परत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि पोलीस उपअधीक्षक व्यंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव, महिला पोलीस अंमलदार स्वाती मुंढे, मनोज परजणे आणि सिद्धेश्वर मांजरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दिंडी, यात्रा, जत्रा आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांनी आपल्या मौल्यवान दागिन्यांची व वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

COMMENTS