अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये चक्क जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प

अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये चक्क जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) ढिसाळ कार्यपद्धतीवर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पॅकेट उघडताच उडाली खळबळ मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आव्हाड यांनी माळीवाडा बसस्थानकाजवळील एका हातगाडीवरून चिक्कीची तीन पॅकेट खरेदी केली होती. मात्र, खरेदी केलेले पॅकेट उघडताच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत अळ्या फिरताना दिसून आल्या. हा अत्यंत किळसवाणा प्रकार पाहून ग्राहक पुरता हादरून गेला. याबाबत त्यांनी संबंधित हातगाडी चालकाला जाब विचारला असता, हा चिक्कीचा माल माळीवाडा परिसरातील एका घाऊक किराणा दुकानातून आणल्याचे त्याने सांगितले.
निकृष्ट अन्नाची खुलेआम विक्री; आरोग्याशी खेळ! या घटनेमुळे शहरात विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुदतबाह्य (Expired), बुरशी लागलेले तसेच निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ खुलेआम विकले जात असल्याच्या तक्रारी असून, जबाबदार यंत्रणा याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. एफडीकडून नियमित तपासणी आणि ठोस कारवाई होत नसल्याने व्यापाऱ्यांचे धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अशा प्रकारचे दूषित खाद्यपदार्थ लहान मुले, विद्यार्थी व प्रवाशांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. त्यामुळे संबंधित दुकान, पुरवठादार आणि दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, तसेच शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची सर्वंकष तपासणी मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दूध भेसळीच्या आरोपांवर दिलीप वळसे पाटलांचे आव्हान: “संबंध आढळल्यास सामाजिक जीवनातून निवृत्ती घेईन!”
दरम्यान, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातही एफडीएने धाड टाकत दूध भेसळ करणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आणले होते. एका नामांकित कंपनीत भेसळयुक्त दूध आढळल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.
आंबेगावचे आमदार तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे भेसळखोरांना पाठीशी घालत असल्याचा घणाघाती आरोप राजकीय विरोधकांनी केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना वळसे पाटील यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. “या दूध भेसळ प्रकरणात माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध आढळल्यास, मी तात्काळ सामाजिक व राजकीय जीवनातून निवृत्ती घेईन,” असे खुले आव्हान देत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

COMMENTS