अहिल्यानगर: अहिल्यानगर, श्रीगोंदा, संगमनेर तालुक्यासह रांजणगाव एमआयडीसी परिसरात शेळ्या व बोकड चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखे

अहिल्यानगर: अहिल्यानगर, श्रीगोंदा, संगमनेर तालुक्यासह रांजणगाव एमआयडीसी परिसरात शेळ्या व बोकड चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, १० लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तब्बल १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, शेळ्या चोरी करणारे आरोपी टाटा सुमो गाडीतून केडगाव बायपास परिसरात येणार आहेत. या बातमीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून संशयित टाटा सुमो अडवली.
वाहनाची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये तीन शेळ्या आणि एक बोकड आढळून आला. पोलिसांनी वाहनातील ओमकार सुधाकर परंवार (वय २७), शहाबाज सिराज कुरेशी (वय २६), सक्षम विवेक भोर (वय १९) आणि अरबाज रशीद कुरेशी (वय २६) या चौघांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून ९ लाख रुपये किमतीचे टाटा सुमो वाहन, २८ हजार रुपये किमतीच्या तीन शेळ्या व एक बोकड, तसेच ३५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण ९.६३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच तपासादरम्यान चोरीच्या शेळ्यांची विक्री करून मिळालेली ५० हजार रुपयांची रोकड देखील जप्त करण्यात आल्याने एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १० लाख १३ हजार रुपये झाली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकरी व पशुपालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

COMMENTS