घारगाव: लग्न समारंभ आटोपल्यानंतर घरासमोर सुरू असलेल्या वरातीत घुसून नवरदेवाच्या वडिलांसह तिघांवर लोखंडी गज, दगड व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याच

घारगाव: लग्न समारंभ आटोपल्यानंतर घरासमोर सुरू असलेल्या वरातीत घुसून नवरदेवाच्या वडिलांसह तिघांवर लोखंडी गज, दगड व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील सतेचीवाडी (शेंडेवाडी) येथे घडली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह १० ते १५ जणांविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी यमाजी पवार (वय ४८) यांच्या मुलाचा विवाह २२ जून रोजी झाला होता. रात्री सुमारे ११.१५ वाजता घरासमोर लग्नाची वरात सुरू असताना, नवरीचा चुलत भाऊ मनोहर नामदेव दुधवडे (रा. पारदरा, ता. पारनेर) हा आपल्या १० ते १५ साथीदारांसह अचानक तेथे आला. त्यानंतर पूर्वीच्या वादाची कुरापत काढून त्याने नवरदेवाच्या नातेवाइकांशी वाद घालण्यास सुरुवात केली, ज्याचे पर्यवसान पुढे मोठ्या मारहाणीत झाले.
हा सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी नवरदेवाचे वडील शिवाजी पवार तसेच त्यांचे पुत्र योगेश व प्रदीप हे मध्ये आले असता, मुख्य आरोपी मनोहर दुधवडे याने शिवाजी पवार यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने गंभीर प्रहार केला. तसेच त्याच्यासोबत आलेल्या इतरांनी योगेश व प्रदीप यांना लोखंडी गज आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर, “जर पोलिसात तक्रार दिली तर संपूर्ण कुटुंबाला ठार मारू,” अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या गंभीर प्रकरणी घारगाव पोलिसांनी मुख्य आरोपी मनोहर नामदेव दुधवडे व त्याच्या १० ते १५ साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आदिनाथ गंधाले या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS