नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका आता थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला बसू लागला आहे. बाफना रोडवरून यात्री नि

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका आता थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला बसू लागला आहे. बाफना रोडवरून यात्री निवासकडे जाणार्या गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या रस्त्याची ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी करण्यात आलेली खोदाई कित्येक महिने उलटूनही अद्याप पूर्ववत करण्यात आलेली नाही. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त करणे अपेक्षित असतानाही महापालिका प्रशासनाने या मार्गाकडे पाठ फिरवल्याने संपूर्ण रस्ता सध्या खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्याच्या विळख्यात सापडला आहे.
एकेकाळी या परिसरातील वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेला बाफना रोड आता वाहनधारकांसाठी अक्षरशः कसोटीचा मार्ग बनला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. चारचाकी वाहनचालकांनाही खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांचा वेग मंदावल्याने काही वेळा वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. अंधारात आणि पाण्याखाली लपलेले खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
ड्रेनेजचे काम नागरिकांच्या सुविधेसाठी करण्यात आले; मात्र कामानंतर रस्ता पूर्ववत न झाल्याने आता ‘सुविधा की गैरसोय?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? काम पूर्ण झाल्याची पाहणी संबंधित अधिकार्यांनी केली का? रस्ता दुरुस्तीला एवढा विलंब का होत आहे? या प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाने देणे गरजेचे आहे. महिनोन्महिने रस्ता याच अवस्थेत पडून असताना नागरिकांना होत असलेला त्रास प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विकासकामांच्या नावाखाली रस्ते खोदले जातात; मात्र काम पूर्ण झाल्यानंतर ते पूर्ववत करण्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, या प्रभागातून भाजपचे चारही नगरसेवक निवडून आले आहेत. मतदारांनी मोठ्या विश्वासाने त्यांना महापालिकेत पाठविले. मात्र, आपल्या परिसरातील प्रमुख रस्त्याची अशी दुरवस्था झाल्यानंतरही या चारही लोकप्रतिनिधींची भूमिका काय, असा सवाल आता मतदारांकडून उपस्थित होत आहे. निवडणुकीच्या काळात नागरिकांच्या दारात जाऊन मत मागणारे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या मूलभूत समस्यांच्या वेळी कुठे आहेत? असा थेट प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून रस्ता तातडीने दुरुस्त करून घेणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना त्यासाठी कितपत प्रयत्न झाले, याची चर्चा आता परिसरात सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यांपेक्षा लोकप्रतिनिधींच्या मौनाचीच अधिक चर्चा होत असून, निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांचा जाब द्यायचा तरी कोणाला? असा संतप्त सूर नागरिकांमधून उमटत आहे.
बाफना रोडची दुरवस्था ही केवळ रस्त्याची समस्या नसून महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. ड्रेनेजचे काम नागरिकांच्या सुविधेसाठी झाले असेल, तर त्यानंतर रस्ता सुरक्षित आणि वाहतुकीयोग्य करून देणेही तितकेच आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने आता कागदी आश्वासनांवर वेळ न दवडता बाफना रोडची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा रस्त्यावरील हे खड्डेच आगामी काळात महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे ‘मापदंड’ ठरतील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

COMMENTS