श्रीरामपूर : येथील डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे सहशालेय उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक गौरव अरविंद डेंगळे यांन
श्रीरामपूर : येथील डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे सहशालेय उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक गौरव अरविंद डेंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडेलाही समान महत्त्व देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याने शाळेत गेल्यानंतर केवळ अभ्यास करावा,परीक्षेत चांगले गुण मिळवावेत आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी,असे वाटते. मात्र, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून खेळालाही तितकेच महत्त्व आहे.खेळामध्ये अव्वल असणारे अनेक विद्यार्थी अभ्यासातही उत्कृष्ट कामगिरी करत असल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचे नियोजन, नेतृत्वगुण, संघभावना, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो आणि या गुणांचा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही सकारात्मक परिणाम होतो.
पालकांनी आजच्या डिजिटल युगाचा विचार करून आपल्या पाल्याच्या दैनंदिन वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे गौरव डेंगळे यांच्या हस्ते शाळेतील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच नव्याने नियुक्त झालेल्या क्रीडा प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना,क्रीडा कौशल्यांना आणि नेतृत्वगुणांना वाव मिळणार असून, या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे फादर फ्रांको, प्रिन्सिपल सिस्टर ब्लेसा, शाळेचे कार्यालयीन अधीक्षक रवी लोंढे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS