Homeताज्या बातम्या

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचा पलटवारकुवैत, बहरीनच्या दिशेने क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले

तेहरान : पश्‍चिम आशियातील तणावाने पुन्हा धोकादायक वळण घेतले असून, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणने कुवैत आणि बहरीनच्या दिशेने क्षेपणास्त्रे त

इराण-अमेरिका युद्ध संपण्याची चिन्हे!; पुढील 48 तासांत युद्धविराम घोषणेची शक्यता; दोन्ही देशांमध्ये 14 कलमी आराखडा तयार
अमेरिकेचा इराण युद्ध जिंकल्याचा दावा; इराणला अणुशक्ती राष्ट्र बनू देणार नसल्याचा ट्रम्प यांचा इशारा
इराणचे नेतृत्व एका हल्ल्यात संपवू शकतोखामेनेईंच्या अंत्यसंस्कारादरम्यान ट्रम्प यांचा इशारा
US Israel attack Iran: Drone targets Bahrain airport


तेहरान : पश्‍चिम आशियातील तणावाने पुन्हा धोकादायक वळण घेतले असून, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणने कुवैत आणि बहरीनच्या दिशेने क्षेपणास्त्रे तसेच ड्रोनद्वारे हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण आखाती प्रदेशात उच्चस्तरीय सतर्कता जाहीर करण्यात आली असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेने इराणमधील काही ठिकाणांवर तीव्र हवाई कारवाई केली. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि मानवरहित विमाने पाठविल्याचे वृत्त आहे. कुवैतच्या संरक्षण दलाने अधिकृत निवेदनात देशाच्या हवाई हद्दीत शत्रूकडून क्षेपणास्त्रे आणि मानवरहित विमानांच्या माध्यमातून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती दिली. या सर्व धोक्यांचा वेळीच मागोवा घेऊन हवाई संरक्षण व्यवस्थेने त्यांना हवेतच निष्प्रभ केल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कुवैतमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे धोक्याचे भोंगे वाजविण्यात आले. सरकारी यंत्रणांनीही ही बाब अधिकृतपणे स्पष्ट केली आहे. राजधानीसह अनेक भागांत मोठे स्फोट झाल्याचे आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. तथापि, संरक्षण दलाने हे स्फोट शत्रूची क्षेपणास्त्रे आणि मानवरहित विमाने हवेतच नष्ट करण्यात आल्यामुळे झाल्याचे सांगितले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कुवैत सरकारने नागरिकांना घराबाहेर अनावश्यक हालचाल टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सुरक्षा यंत्रणांकडून वेळोवेळी जारी होणार्‍या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यात मागील महिन्यात संघर्षविरामासंदर्भात एक करार झाल्याचे सांगितले जाते. या करारानुसार सुमारे साठ दिवस लष्करी कारवाया थांबविणे तसेच व्यापारी जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीला संरक्षण देण्यावर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली होती. मात्र, मंगळवारी होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात तीन व्यापारी तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्रे आणि मानवरहित विमानांद्वारे हल्ला झाल्याचा आरोप इराणवर करण्यात आला. या जहाजांपैकी काही जहाजांचा संबंध सौदी अरेबिया आणि कतारशी असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, ओमानच्या किनार्‍याजवळ द्रवीकृत नैसर्गिक वायू वाहून नेणार्‍या एका जहाजाला आग लागल्याचेही वृत्त समोर आले आहे. इराणने मात्र या आरोपांचे समर्थन न करता संबंधित जहाजांनी पूर्वसूचना आणि इशार्‍यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई करण्यात आल्याचा दावा केला आहे.
आखाती प्रदेशात वाढली चिंता
सध्याच्या घडामोडींमुळे कुवैत, बहरीन, कतार, सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापारी मार्गांपैकी एक असल्याने या भागातील वाढता तणाव जागतिक ऊर्जा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम करू शकतो, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS