नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळूनही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळूनही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आलेली जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असल्याने तिचे मनपाकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव गेल्या चार महिन्यांपासून शासनाच्या लालफितीत अडकला आहे. त्यामुळे सत्तेतील पक्षाच्याच नेत्याच्या पुतळ्यासाठी जागा मिळवताना महापालिकेला मंत्रालयाच्या पायर्या झिजवाव्या लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने जाहीर केलेल्या संकल्पनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पहिल्याच सभेत वाजपेयी यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर जागेचा शोध घेऊन कौठा परिसरातील लुटे मामा चौकालगतची जागा निश्चित करण्यात आली. मात्र, ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने त्यातील २० गुंठे जागा मनपाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला.
स्थानिक पातळीवर आवश्यक कार्यवाही करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी प्रस्ताव शासनाच्या सचिवांकडे पाठविला. मात्र त्यानंतर प्रस्तावाच्या फाईलला जणू ब्रेकच लागला आहे. वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार अशोकराव चव्हाण यांनीही या प्रकरणात लक्ष घातले होते. जागेबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केल्या होत्या. तरीदेखील प्रस्ताव मंत्रालयीन पातळीवर अडकून राहिल्याने महापालिकेच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.
दरम्यान, कोणत्याही व्यक्तीच्या पुतळ्यासाठी किंवा स्मारकासाठी जागा देण्याचा अधिकार सचिव पातळीवर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव आता मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित जागा मनपाकडे हस्तांतरित होऊ शकणार आहे. जागा हस्तांतरणाबाबत संबंधितांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती मनपाचे अपर आयुक्त गिरीश कदम यांनी दिली.
जागेचा प्रश्न प्रलंबित असला तरी पुतळा उभारणीसाठी महापालिकेने आपल्या स्तरावरील प्राथमिक प्रक्रिया सुरू ठेवली आहे. सुमारे २० हजार चौरस फुटांच्या प्रस्तावित जागेवरील प्रकल्पासाठी वास्तुविशारद गणेश मोरे यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुतळा निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या पहिल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दुसर्यांदा निविदा मागविण्यात आली असून पाच शिल्पकारांनी निविदा सादर केल्या आहेत. मात्र, जागाच मनपाच्या ताब्यात आलेली नसल्याने पुढील प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे. पुतळ्याची निविदा पुढे सरकली, सल्लागार नियुक्त झाला; पण पुतळा उभा करायचा त्या जागेचीच फाईल मंत्रालयात अडकली आहे. त्यामुळे भाजपच्या संकल्पनाम्यातील वाजपेयींचा पुतळा प्रत्यक्षात कधी उभा राहणार, हा प्रश्न आता नांदेडकरांसमोर आहे.

COMMENTS