नांदेड : शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना मदत, पीकविमा, मराठवाड्याचा विकास अनुशेष, एमपीएससी व नीट परीक्षांतील कथित गैरव्यवहार अशा विविध प्रश्

नांदेड : शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना मदत, पीकविमा, मराठवाड्याचा विकास अनुशेष, एमपीएससी व नीट परीक्षांतील कथित गैरव्यवहार अशा विविध प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 29 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ’शेतकरी एल्गार’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन असून, सरकारला गुडघ्यावर बसविण्याची वेळ आणू, असा इशारा त्यांनी दिला.
रोहित पवार यांनी 2017 मधील कर्जमाफी योजनेचा उल्लेख करत सरकारने 34 हजार कोटी रुपयांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात केवळ 19 हजार कोटी रुपयांचीच कर्जमाफी झाल्याचा दावा केला. त्यामुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन टप्प्यांत थेट शेतकर्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला. नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून, सोयाबीन पीकविम्याचे चारही ट्रिगर वेळेत लागू केले असते तर जिल्ह्यातील शेतकर्यांना सुमारे 2200 कोटी रुपयांचा विमा मिळाला असता, असा दावा त्यांनी केला. सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे सांगत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरही त्यांनी आक्षेप घेत मराठवाड्याचा विकास अनुशेष भरून काढण्याला प्राधान्य देण्याची मागणी केली. या महामार्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत सरकारने या प्रकल्पाचा फेरविचार करावा, असे त्यांनी म्हटले. भाजप नेते अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका करत त्यांना केवळ शहरापुरते मर्यादित ठेवण्यात आले असून ते नगरसेवकांच्या मुलाखती घेण्यात व्यस्त आहेत, असा टोला त्यांनी लगावला. सध्याच्या पक्षांतरामागे मतदारसंघ पुनर्रचनेची भीती असल्याचा आरोपही त्यांनी केला. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नांदेडच्या सचखंड गुरुद्वारासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शीख समाजाला विश्वासात घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, भगवानराव आलेगावकर, सुभाषराव कोळगावकर, धनंजय सूर्यवंशी, शिवाजी कदम, समाधान जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परिषदेनंतर 29 जूनच्या आंदोलनाच्या नियोजनाबाबत पक्षाची विशेष बैठक घेण्यात आली.

COMMENTS