मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी विविध जिल्ह्यात चांगलाच जोर वाढवला होता. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठ

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी विविध जिल्ह्यात चांगलाच जोर वाढवला होता. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. नाशिक घाटमाथा परिसरासाठी अतिधोक्याचा इशारा देण्यात आला असून, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. गडचिरोलीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून जळगाव, विदर्भ आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, जून आणि जुलै या दोन महिन्यांत राज्यात सरासरीच्या तुलनेत 96.4 टक्के पर्जन्य झाला आहे. मात्र मराठवाड्यात केवळ 82.1 टक्के पावसाची नोंद झाल्याने काही भागांत अद्यापही पावसाची तूट कायम आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांतील जलसाठा वेगाने वाढला आहे. त्यामुळे खडकवासला, निरा देवघर, भामा आसखेड आणि पानशेत या धरणांतून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून सुमारे 45 हजार घनफूट प्रति सेकंद इतका करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे मुसळधार पावसामुळे शंभर वर्षांहून अधिक जुनी नगरपालिकेची इमारत अंशतः कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित इमारतीत नियमित कार्यालयीन कामकाज होत नसून स्वच्छता साहित्य व अन्य साहित्य साठवण्यासाठी तिचा वापर केला जात असल्याने मोठी दुर्घटना टळली. हिंगोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील 30 पैकी 27 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सेनगाव तालुक्यातील रामप्रसादनगर परिसरात पुलावरून एक मोटार पुराच्या पाण्यात वाहून गेली. मात्र वाहनातील चौघांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांचे प्राण वाचले. सततच्या पावसामुळे अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. धरणांमधून वाढीव पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या भागांतील नागरिकांनी सावध राहावे, पूरग्रस्त भागात अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यवतमाळमध्ये पुराच्या आईसह दोन मुली बेपत्ता
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात दहेली येथे अडाण नदीवरील पुलावरून जात असताना पुराच्या प्रचंड प्रवाहात एक चारचाकी मोटार वाहून गेली. या दुर्घटनेत एका महिलेसह तिच्या दोन मुली बेपत्ता झाल्या असून, वाहनचालकाने झाडाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचविला. बेपत्ता तिघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली आहे.

COMMENTS