Homeताज्या बातम्या

दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्पअनेक गाड्या रद्द, प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. सोमवारी पहाटे कर्जत-लोणावळा दरम्यानच्या भोर घाट परिसरात दोन ठ

मावळ तालुक्यात दरड कोसळून तिघांचा मृत्यू23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश
अतिवृष्टीचे की व्यवस्थेचे बळी ?
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवारमध्ये भूस्खलन, रस्तेही बंद


मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. सोमवारी पहाटे कर्जत-लोणावळा दरम्यानच्या भोर घाट परिसरात दोन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. दरडीमुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड साचल्याने तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतूक तातडीने थांबवावी लागली. परिणामी अनेक प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर काही गाड्या अंशतः चालवण्यात येत आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पहिली दरड ठाकूरवाडी परिसरात, तर दुसरी खंडाळा आणि मंकी हिलदरम्यान पहाटे सुमारे तीनच्या सुमारास कोसळली. सततच्या पावसामुळे डोंगरकड्यावरील माती आणि दगड रेल्वे रुळांवर आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेची विशेष पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुळांवरील मलबा हटविणे, रेल्वे मार्गाची तपासणी करणे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. मात्र, परिसरात अजूनही पाऊस सुरू असल्याने कामात अडथळे निर्माण होत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. कर्जत-लोणावळा दरम्यानचा भोर घाट विभाग हा पश्‍चिम घाटातील अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक रेल्वेमार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर मुंबईकडे जाणारा मार्ग, पुण्याकडे जाणारा मार्ग तसेच मध्य मार्ग अशा तीन रेल्वे रुळांवरून वाहतूक केली जाते. दोन्ही ठिकाणी झालेल्या दरडींचा परिणाम तिन्ही मार्गांवर झाल्याने मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे.
16 रेल्वे गाड्या रद्द; अनेक गाड्यांचे मार्ग बदलले
दरडीच्या घटनेमुळे 6 जुलै रोजी धावणार्‍या एकूण 16 प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये इंद्रायणी एक्सप्रेस, आंतरनगरी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस आणि धुळे एक्सप्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे संचालन मधल्या स्थानकांपर्यंत मर्यादित करण्यात आले असून, काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
प्रवाशांसाठी हेल्पलाईन क्रमांक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : 022-22694040, ठाणे : 9321336747, लोणावळा : 8356854238, दादर : 9136452387 या क्रमांकांवर संपर्क साधून प्रवासी आपल्या गाडीची सद्यस्थिती, मार्गातील बदल तसेच प्रवासासंबंधी आवश्यक माहिती मिळवू शकतात. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तसेच पोलिसांनीही मुसळधार पाऊस आणि दरडीचा धोका लक्षात घेता अत्यावश्यक काम नसल्यास सध्या मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास टाळावा, असे नागरिकांना आवाहन केले आहे.

COMMENTS