नांदेड: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड दौर्यात विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली. शिवसेना पक्षावरील न्
नांदेड: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड दौर्यात विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली. शिवसेना पक्षावरील न्यायालयीन वाद, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीका, कथित ऑडिओ क्लिप प्रकरण तसेच नांदेडमधील औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. शिवसेना पक्ष आणि ’धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची बाजू कायदेशीरदृष्ट्या भक्कम असल्याचा दावा सामंत यांनी केला. आवश्यक सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले असून, अंतिम निर्णय शिवसेनेच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया माध्यमातून करण्यात आलेल्या टीकेचा समाचार घेताना सामंत म्हणाले, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिला नेत्यांविषयी अशा प्रकारची वैयक्तिक टीका महाराष्ट्राची संस्कृती नाही. सुनेत्रा पवार या जबाबदारीने काम करणार्या नेत्या असून, अशा वक्तव्यांना राज्यातील महिला लोकशाही मार्गाने उत्तर देतील. भाजप नेत्यांशी संबंधित कथित ऑडिओ क्लिपबाबतही त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनावट ध्वनिचित्रफिती तयार होण्याचे प्रकार वाढत असल्याने या प्रकरणातील सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. चौकशीत क्लिप खोटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, तर ती खरी असल्यास वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे, असेही ते म्हणाले. पंकजा मुंडे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्या असून, पक्षातील जबाबदार्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींनाच असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नांदेडमध्ये प्रस्तावित हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्पासाठी एका कंपनीशी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती देत सामंत यांनी औद्योगिक गुंतवणूक वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले. विकासकामांचा आढावा आणि शिवसेनेच्या बूथस्तरीय संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठीच नांदेड दौरा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS