मुंबई : मुंबईतील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी दुपारी दोन लोकल रेल्वेची होणारी टक्कर थोडक्यात टळल्याने हजारो प्रवाशांचा

मुंबई : मुंबईतील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी दुपारी दोन लोकल रेल्वेची होणारी टक्कर थोडक्यात टळल्याने हजारो प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. एकाच मार्गावर दोन लोकल रेल्वे समोरासमोर आल्याने क्षणभर भीतीचे वातावरण पसरले. मात्र, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.
बदलापूरहून येणारी जलद लोकल नियोजित चौथ्या फलाटाऐवजी चुकून पाचव्या फलाटावर वळवण्यात आली. त्याच वेळी पाचव्या फलाटावर दुसरी लोकल उभी होती. सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. समोरासमोर येणार्या गाड्यांचा धोका लक्षात येताच मोटरमनने क्षणाचाही विलंब न करता गाडी थांबवली. त्यामुळे दोन्ही गाड्यांमधील अंतर अत्यल्प राहिले, तरी संभाव्य टक्कर टळली. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून पाचव्या ते आठव्या फलाटांवरील वाहतूक काही काळासाठी थांबवली. त्यामुळे स्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित लोकलला सुरक्षितपणे मागे घेण्याची प्रक्रिया अत्यंत सावधगिरीने पार पाडण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व हालचाली नियंत्रित पद्धतीने करण्यात आल्या. ही घटना गर्दीच्या वेळेत घडल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. जलद मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्याने विविध स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. अनेक प्रवासी फलाटांवर अडकून पडले, तर काहींना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला. रेल्वेकडून सतत सूचना देऊन परिस्थितीची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गंभीर प्रकाराची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली असून, सिग्नल यंत्रणेत नेमका कोणता बिघाड झाला याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून अहवाल मागवण्यात आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सदर लोकल मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही विलंबाने वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

COMMENTS