माहूर: माहूर गडावरील श्री अनुसया माता मंदिर परिसरात रविवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी पट्टेदार वाघाने गोदानातून प्राप्त झालेल्या गाईवर हल्ला करून तिचा फ

माहूर: माहूर गडावरील श्री अनुसया माता मंदिर परिसरात रविवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी पट्टेदार वाघाने गोदानातून प्राप्त झालेल्या गाईवर हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या दरम्यान मंदिरालगतच्या जंगल परिसरात घडली असून, अनेक नागरिकांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीर्थक्षेत्र माहूर येथे श्री रेणुकामाता, श्री दत्तशिखर आणि श्री अनुसया माता यांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक देशभरातून येतात. हिंदू धर्मात गोदानाला विशेष महत्त्व असल्याने अनेक भाविक मंदिर संस्थानला गाई दान करतात. अशाच एका दानातील गाईचा काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत पाय निकामी झाला होता. त्यामुळे ती लंगडत मंदिर परिसरातील जंगलात मुक्तपणे चरत होती. दरम्यान, माहूर तालुक्यालगत असलेल्या पैनगंगा अभयारण्यात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल, सांबर, रानडुक्कर यांसह विविध वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. भक्षाच्या शोधात हे हिंस्र प्राणी अनेकदा माहूरच्या जंगल परिसरात येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 2 ऑगस्ट रोजीही अनेक वाहनचालकांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याची चर्चा होती. सायंकाळच्या सुमारास अनुसया माता मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंग परिसरात ती गाय एकटीच फिरत असताना वाघाने अचानक झडप घातली. त्यानंतर गाईला सुमारे 50 ते 60 मीटरपर्यंत फरफटत नेऊन बाजूच्या दरीत तिचा फडशा पाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वाघाचे रौद्ररूप पाहताच उपस्थित नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून धाव घेतली. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला असून, तत्काळ प्रतिसाद मिळाला नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली. मागील वर्षभरापासून माहूर शहर व परिसरात बिबट, अस्वल, रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार होत असल्याचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. मात्र, अद्याप वन विभागाला कोणत्याही हिंस्र प्राण्याला जेरबंद करण्यात यश आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वन विभागाने शहर व मंदिर परिसरात नियमित गस्त वाढवून हिंस्र वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिक व भाविकांकडून होत आहे. या घटनेबाबत माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही. माहूर वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघ आढळल्याची कोणतीही अधिकृत नोंद नाही.
- रोहित जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, माहूर

COMMENTS