Homeताज्या बातम्याक्रीडा

कोण ठरणार राजकोटचा राजा ?

क्रिकेट समिक्षक

गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी नव्याने नामकरण झालेल्या गुजरातमधील राजकोट येथील निरंजन शहा क्रिकेट स्टेडियमवर भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान डब्ल्यूट

कुस्तीपटू आणि पोलीसांमध्ये धक्काबुक्की
महाराष्ट्र दिनानिमित्त घाटमाथ्यावर कुस्ती मैदान; पंचक्रोशी कुस्ती मंडळाचा निर्धार
दिल्लीच्या पराभवाने आरसीबी प्लेऑफमध्ये ; कर्णधार रिषभ पंत ठरला खलनायक !

गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी नव्याने नामकरण झालेल्या गुजरातमधील राजकोट येथील निरंजन शहा क्रिकेट स्टेडियमवर भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान डब्ल्यूटीसी अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या दोन कसोटीतील हैद्राबादचा पहिला कसोटी इंग्लंडने जिंकला तर खेळाडूंच्या दुखापती, प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीच्या पार्श्वभूमीवर टिम इंडियाने विश्वाखापट्टणम कसोटीत पलटवार करत मालिका बरोबरीत आणली. त्यामुळे या तिसऱ्या कसोटीकडे सर्वांचे लक्ष लागले असून यातील विजेता मालिका जिंकण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकेल. 

                राजकोटला भारत आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी सन २०१८ ला विंडिजविरूध्द विजय मिळविला आहे, तर सन २०१६ ला इंग्लंडविरूध्दचा सामना अनिर्णित राहिला आहे. राजकोटच्या मैदानावर फिरकी गोलंदाज यशस्वी ठरत असले तरी फलंदाजांनी धावांच्या राशीही ओतल्या आहेत. त्यामुळे हा सामनाही वेगळा होईल असे वाटत नसले तरी इंग्लंडचा संघही येथे अपराजित राहिलेला आहे. शिवाय त्यांची आक्रमक वृत्ती खेळाचा नूर बदलू शकते. इंग्लंडची फलंदाजीची तुलना केली तर भारतीय फलंदाजांपेक्षा त्यांची बाजू किती तरी पट वरचढ दिसते. फॉर्मात असलेला जॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, ज्यो रूट, बेन स्टोक्स, बेन फोक्स हे मोठया नावाचे व फॉर्मात असलेले फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. शिवाय तळाचे, बशीर, हार्टली, रेहान यांनीही खेळलेल्या प्रत्येक डावात आपले योगदान दिले आहे.

             त्या उलट भारताकडून विराट कोहली, के एल राहुल, श्रेयस अय्यर हे प्रमुख फलंदाज विविध कारणांमुळे संघात नाहीत. एकटा कर्णधार रोहित शर्माच काय तो अनुभवी फलंदाज आहे. मात्र मागील चार डावात त्याच्या बॅटमधून फक्त ९० धावाच निघाल्या आहेत. तसेच दुसरा अनुभवी फलंदाज शुभमन गिल गेल्या बारा डावानंतर शतक करू शकला. मात्र विशाखापट्टणमच्या त्या सामन्यात त्याच्या बोटाला चांगलीच दुखापत झाली होती. त्यानंतर अकरा दिवस त्याला ठिक होण्यास मिळाले आहेत. तरीही त्या दुखापतीचा त्याने बाऊ करून न घेतला तर बरेच होईल. रविंद्र जडेजाही दुखापतीनंतर परतत असल्याने त्याच्या खेळण्या संदर्भात सामन्याच्या दिवशीच सर्व काही स्पष्ट होईल. रजत पाटीदारने मागच्याच सामन्यात पदार्पण केले असले तरी त्याचा तेथे विशेष प्रभाव पडला नसल्याने त्याच्यावरही फारसे विसंबून राहू शकत नाही.

              अक्षर पटेलची कामगिरी दोन्ही सामन्यात चांगली राहिली असली तरी जडेजाला खेळविण्याच्या अट्टाहासापायी त्याला बाहेर बसावे लागू शकते. केएस भरत हा यष्टीरक्षक फलंदाज स्टंप्सच्या मागे आणि पुढे अपयशी ठरल्याने ध्रुव जुरेल हा त्याच्या जागी दिसू शकतो. मात्र नवा व याच सामन्याद्वारे पदार्पण करण्याची शक्यता असलेला सर्फराज खानही चांगला यष्टीरक्षक असल्याने ध्रुव ऐवजी तोच यष्टीरक्षण सांभाळू शकतो. अक्षर पटेल व जडेजा या दोघांनाही संघात ठेवून त्यांच्या अष्टपैलूत्वाचा लाभ घेण्यासाठी हा प्रयोग केला जाऊ शकतो. मात्र त्याचा निर्णय संघ प्रबंधन कसा विचार करते यावर अवलंबून आहे. एकंदर विचार केला तर भारताची फलंदाजी अनुभवहिण, नवखी व बेभरवशाची आहे. या मध्ये यशस्वी जयस्वालचे दोन्ही सामन्यांच्या पहिल्या डावातील अनुक्रमे ८६ व २०९ धावांचे योगदान वगळता महत्वाच्या दुसऱ्या डावातील त्याचे अपयशही चिंता वाढविणारे आहे.

              गोलंदाजीत रविंद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, कुलदिप यादव यांच्यावर फिरकीचा भार असेल. अक्षर पटेलला जर खेळविले तर फिरकी गोलंदाजी आणखी मजबूत होईल. शिवाय अक्षर, जडेजा, आश्विन हे तिघेही अष्टपैलू म्हणून आतापर्यंत चांगले सिध्द झाले आहेत. या सामन्यात त्यांचा जुगार यशस्वी ठरला तर भारताचे काम फत्ते होऊ शकते.

                वेगवान गोलंदाजीची धुरा मागच्या दोन्ही सामन्यात एकट्या जसप्रित बुमराहाने यशस्वीरित्या पेलल्याने भारताचे पितळ उघडे पडले नाही. हैद्राबादला मोहम्मद सिराज तर विशाखापट्टणमला मुकेशकुमार बुमराहाचे सहकारी होते. मात्र दोघेही निष्प्रभ ठरले होते. आता पुन्हा सिराज संघात परतू शकतो. मात्र एखाद्या सामन्यात भन्नाट कामगिरी करायची व नंतर बरेच सामने कडक दुष्काळ पडल्यागत त्याची गोलंदाजी होते. कामगिरीत सातत्य नसणे ही त्याची मोठी कमजोरी ठरत आहे. या बाबीवर त्याच्याकडून काम होणे गरजेचे आहे.

            इंग्लंडचे फिरकी गोलंदाज नवखे असले तरी कागदोपत्री भारताच्या अनुभवी फिरकी गोलंदाजांपेक्षा बळी घेणे, धावा देणे, सरासरीच्या बाबत उजवे ठरले आहेत. परंतु भारताच्या फलंदाजांची हाराकिरी हि प्रमुख बाब इंग्लिश फिरकीपटूंच्या यशाला जबाबदार आहेत. भारताचे नवे फलंदाज या सामन्यात संयमाने खेळले तर भारताच्या विजयाची शक्यता वाढेल. कारण दोन्ही संघांचे गोलंदाज त्यांचे कार्य योग्यरित्या करत आहेत. मात्र ज्यांचे फलंदाज निर्णायक टप्प्यात धावा काढतात तोच संघ विजयी झालेला आहे. हे आपण मागच्या दोन्ही सामन्यात पाहिले आहेच.

            राजकोट कसोटी ऐतिहासिक ठरण्याची मोठी शक्यता आहे. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स मैदानात उतरेल तेंव्हा तो त्याचा वैयक्तिक शंभरावा कसोटी सामना ठरेल. तर इंग्लंडच्या ४१ वर्षीय जिमी अँडरसनने या सामन्यात पाच बळी घेतले तर त्याचे ७०० कसोटी बळी पूर्ण होतील व अशी कामगिरी करणारा तो जगातला तिसरा गोलंदाज ठरेल. त्याचबरोबर तो एकमेव वेगवान गोलंदाज असेल. त्याच्या पूर्वी ८०० बळी घेणारा मुरलीधरन व ७०९ बळी घेणारा स्व. शेन वॉर्न हे फिरकी गोलंदाज होते.

             भारताचा फिरकीपटू रविचंद्रन आश्विन एक गडी बाद करील तेंव्हा त्याचे पाचशे कसोटी बळी पूर्ण होतील व सर्वात कमी कसोटी सामन्यात अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला गोलंदाज ठरेल. एकंदर राजकोट कसोटी ऐतिहासिक ठरणार आहेच पण यातील विजेता मालिका विजयी ठरणारा संघ ठरल्यास आश्चर्य नसेल.

COMMENTS