नवी दिल्ली: भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला जागतिक स्तरावर आणखी एक मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. दक्षिण कोरियातील बुसान येथे

नवी दिल्ली: भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला जागतिक स्तरावर आणखी एक मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. दक्षिण कोरियातील बुसान येथे सुरू असलेल्या जागतिक वारसा समितीच्या ४८ व्या अधिवेशनात उत्तर प्रदेशातील सारनाथ येथील प्राचीन बौद्ध वारसा स्थळाचा युनेस्कोच्या ‘जागतिक वारसा’ (World Heritage) यादीत समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळालेल्या भारतातील स्थळांची संख्या आता ४५ झाली आहे.
सारनाथचा समावेश हा केवळ एका ऐतिहासिक स्थळाचा गौरव नसून भारताच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि स्थापत्य परंपरेला मिळालेली आंतरराष्ट्रीय मान्यता मानली जात आहे. भारताने २०२५-२६ या कालावधीसाठी सारनाथच्या नामांकनाचा प्रस्ताव सादर केला होता. विविध निकषांवर सखोल परीक्षण केल्यानंतर युनेस्को समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. या ऐतिहासिक निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत करत सर्व देशवासीयांचे अभिनंदन केले आहे.
या प्रमुख प्राचीन वास्तूंचा समावेश
जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळालेल्या सारनाथ वारसा क्षेत्रात प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश आहे: १. चौखंडी स्तूप २. सारनाथचे पुरातत्वीय अवशेष: यामध्ये धमेख स्तूप, धर्मराजिका स्तूप, मूलगंधकुटी विहार, सम्राट अशोकांनी उभारलेला प्रसिद्ध ‘अशोक स्तंभ’ आणि इतर प्राचीन वास्तूंचा समावेश आहे.
भगवान बुद्धांच्या पहिल्या उपदेशाची पवित्र भूमी
बौद्ध परंपरेनुसार सारनाथला ऋषिपट्टण, इसिपट्टण आणि मृगदाव अशा विविध नावांनी ओळखले जाते. भगवान गौतम बुद्धांनी बोधगया येथे ज्ञानप्राप्तीनंतर सर्वप्रथम याच ठिकाणी आपल्या पाच शिष्यांना पहिला उपदेश दिला होता. ‘धम्मचक्र प्रवर्तन’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे पहिले प्रवचन बौद्ध धर्माच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. याच ठिकाणी बौद्ध संघाची स्थापना झाली आणि ‘आर्य अष्टांगिक मार्गा’ची मांडणी करण्यात आली. त्यामुळे सारनाथला बौद्ध धर्माच्या चार प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक अत्यंत पवित्र स्थान मानले जाते.

COMMENTS