Homeताज्या बातम्या

आधी राजीनामा, नंतरच चर्चा! नीट प्रश्नपत्रिका गैरव्यवहारावरून संसद भवनाबाहेर विरोधी पक्ष आक्रमक

नवी दिल्ली: नीट प्रश्नपत्रिका गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील आंदोलनाला आता तीव्र राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. जंतर-मंतर येथे

शेतकर्‍यांनी रोखला महामार्ग; अंबाजोगाई-लातूर वाहतूक विस्कळीत; हजारो शेतकर्‍यांच्या आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष
आषाढी एकादशीपूर्वीच पंढरपुरात भाविकांचा महापूर; विठ्ठल दर्शनाची रांग ८ किलोमीटरवर, प्रसादासाठी १२ लाख लाडू सज्ज!
निर्भीड पत्रकार संघाच्या परळी तालुका अध्यक्षपदी बालाजी ढगे, उपाध्यक्षपदी कृष्णा सरवदे यांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली: नीट प्रश्नपत्रिका गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील आंदोलनाला आता तीव्र राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करत विरोधी पक्षांनी संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन छेडले. ‘आधी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, नंतरच चर्चा’ असा आक्रमक पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला असून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि खासदार या आंदोलनात सहभागी झाले. प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणावर संसदेच्या दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चा व्हावी, दोषिंवर कठोर कारवाई करावी आणि शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

विरोधकांच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनीही संसद भवनाबाहेर स्वतंत्र आंदोलन सुरू केले. त्यांनी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. त्यामुळे काही काळ संसद भवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी खासदार आमनेसामने आल्याने वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले होते. दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या घोषणाबाजीमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

शासनाचा चर्चेचा प्रस्ताव, परंतु आंदोलनकर्त्यांची अट कायम

दरम्यान, केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी कोणत्याही वेळी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, सरकारने बुधवार दुपारपासून गुरुवार दुपारपर्यंत आंदोलनाच्या प्रतिनिधींना चार वेळा चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. संवादातूनच प्रश्नावर मार्ग निघू शकतो, असा विश्वास व्यक्त करत सरकार चर्चेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, आंदोलकांनी सरकारच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. चर्चा ही जंतर-मंतर किंवा इतर कोणत्याही तटस्थ ठिकाणीच व्हावी, अशी अट आंदोलनकर्त्यांनी घातली आहे. नीट प्रश्नपत्रिका प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि जबाबदारांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीवर विरोधी पक्ष आणि आंदोलक ठाम असल्याने या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे.

COMMENTS