रस्त्यावर गुंडगिरी करून दहशत माजविणार्या आणि सर्वसामान्यांना धाक दाखवून लूटमार करणार्या दोन सराईत गुंडांना शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा घडल्यानंत

रस्त्यावर गुंडगिरी करून दहशत माजविणार्या आणि सर्वसामान्यांना धाक दाखवून लूटमार करणार्या दोन सराईत गुंडांना शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच जेरबंद केले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हुंडाई कार, लोखंडी रॉड आणि लाकडी काठी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.
दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजण्याच्या सुमारास नगर नाका परिसरातील बंब सर्कल येथील बालाजी नाष्टा सेंटरमध्ये दिलीप साहेबराव वायभट (वय 38) हे काम करत होते. त्यावेळी आरोपी स्वप्नील भाऊसाहेब शिंदे (वय 34, रा. श्रीरामनगर) आणि आदेश भगवान जोगदंड (वय 24, रा. जायकवाडी कॉलनी) हे कार क्रमांक एमएच-23-एयू-6988 मधून तेथे आले. दोघांनी नाश्त्याचे पैसे न देता उलट दारू पिण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत बिअरची बाटली, लोखंडी रॉड व लाकडी काठीने फिर्यादी व त्यांच्या भावावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 222/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 109(1), 308(2), 115(2), 118(2), 352, 351(2), 351(3), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अण्णाभाऊ साठे चौक परिसरात सापळा रचला. दि. 2 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हुंडाई कार, लोखंडी रॉड आणि लाकडी काठी जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या आदेश जोगदंड याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाचा प्रयत्न, अस्त्र-शस्त्र कायदा तसेच इतर गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रस्त्यावर दहशत निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणार्या आणि गुंडगिरी करणार्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी ही धडक कारवाई केली. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना नागरिकांनी न घाबरता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटराम आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. माधव काटकर, ग्रेड पोउपनि./राख, पोह/470 ज्ञानेश्वर मराडे, पोशि/19 अनिल आसेवार, पोशि/1967 अनिल घटमाळ आणि पोशि/272 नवनाथ डाके यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.

COMMENTS