पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा दुचाकीवरून जाणार्या सराफा व्यावसायिकाला अडवून सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याच्या खळबळजनक प्रकरणाचा स्थानिक

पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा दुचाकीवरून जाणार्या सराफा व्यावसायिकाला अडवून सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याच्या खळबळजनक प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसांतच पर्दाफाश केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी टोळीतील मुख्य आरोपींपैकी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार तसेच चोरीचा ऐवज असा एकूण 6 लाख 93 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
2 ऑगस्ट 2026 रोजी हिवरसिंगा येथील सराफा व्यावसायिक रमेश उदावंत (वय 47) हे निर्गुडी येथील आठवडी बाजारासाठी सोन्या-चांदीचे दागिने घेऊन मोटारसायकलवरून जात होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास निर्गुडी-हिवरसिंगा रस्त्यावर पांढर्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने लुटून आरोपी पसार झाले. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय बातमीदार व खबर्यांच्या माध्यमातून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान रोहन ऊर्फ बॉबी संजय गुणवंत (वय 24, रा. शास्त्रीनगर, नाळवंडी नाका, बीड) याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार क्रमांक चक-12 गच्-4300 तसेच चोरीस गेलेला सोन्या-चांदीचा ऐवज असा एकूण 6,93,800 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक शेखर औटे, पोहेकॉ अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळासाहेब सानप, मारुती कांबळे, आसेफ शेख, पोअ अश्विनकुमार सुरवसे तसेच चापोअ सिद्धेश्वर मांजरे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

COMMENTS