Homeताज्या बातम्या

ट्युशन परिसरात गुंडगिरीचा थरार; बारावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्लालातूरमध्ये उपचार सुरू; प्रकृती चिंताजनक, तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अंबाजोगाई शहरातील आनंदनगर येथील शिकवणी परिसरात गुंडगिरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री अभ्यासिका संपवून रूमकडे परतणार्‍या बारावी विज्ञान श

राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा महायज्ञ; 135 रक्तदात्यांचा विक्रमी सहभाग
बी.फार्मसी महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभराजकिशोर मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ; जीपॅट पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार



अंबाजोगाई शहरातील आनंदनगर येथील शिकवणी परिसरात गुंडगिरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री अभ्यासिका संपवून रूमकडे परतणार्‍या बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
आशिष विनोद माने (वय 17, रा. रेपेवाडी, सध्या रा. माळीनगर, अंबाजोगाई) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. आशिष हा अंबाजोगाई येथे किरायाने खोली करून शिक्षण घेत आहे. बुधवारी (दि.17) रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास तो आनंदनगर परिसरातील अभ्यासिकेतून अभ्यास करून पायी रूमकडे जात असताना ही घटना घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीने आशिषला अडवून विनाकारण शिवीगाळ केली. त्यानंतर एका आरोपीने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आशिष रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर कोसळला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत असलेल्या आशिषने मदतीसाठी आलेल्या व्यक्तीला आपल्या मोबाईलचा पासवर्ड सांगितला आणि त्यानंतर तो बेशुद्ध झाला. संबंधित व्यक्तीने आशिषच्या आईला फोन करून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीविरोधात बीएनएस कलम 109, 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ कागणे करत आहेत.
तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी तातडीने पथक रवाना करून आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. साहिल आणि जीतू मांदळे यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ट्युशन परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, या घटनेनंतर अंबाजोगाईतील शिकवणी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या भागात टवाळखोर तरुणांचा वावर वाढल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून, विद्यार्थिनींची छेडछाड, मारामार्‍या आणि वेगाने वाहन चालवण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांची नियमित गस्त वाढवून अशा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून होत आहे. उद्या एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतर कारवाई करून उपयोग काय? असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS