नागपूर : ऑनलाइन डिलिव्हरी कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून ब्लिंकिटच्या दोन डिलिव्हरी बॉयनी आपल्या सहकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्काद

नागपूर : ऑनलाइन डिलिव्हरी कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून ब्लिंकिटच्या दोन डिलिव्हरी बॉयनी आपल्या सहकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमीचे नाव आमीन मुस्तफा पठाण (वय ३४) असून तो उंटखाना परिसरातील रहिवासी आहे. आरोपी केतन उरकुडे (वय २०) आणि श्रवण बारई (वय २०) हे दोघेही त्याच ब्लिंकिट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात.
आमीन वेळेत डिलिव्हरी पूर्ण करत असल्याने कंपनीत त्याची चांगली प्रतिमा होती आणि त्याला इन्सेंटिव्हही मिळत होते. याच कारणावरून आरोपी त्याच्यावर नाराज होते. रविवारी सकाळी दोघांनी आमीनशी वाद घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशातच रात्री मॉडेल मिल चौकात डिलिव्हरी करून परतत असताना एसटी महामंडळाच्या क्वार्टर्ससमोर आरोपींनी त्याची दुचाकी अडवून चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या आमीनला स्थानिकांनी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.
दरम्यान, नागपुरातील दुसऱ्या एका घटनेत अल्पवयीन मुलीचे अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी निर्मय पाखरे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन रुग्णालयात दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिथेही तो डॉक्टरांच्या उपचाराला सहकार्य करत नसल्याची माहिती आहे. ३ ऑगस्टच्या रात्री पोलिसांनी त्याला पीडित मुलीला दिघोरी परिसरातील एका भाड्याच्या घरात डांबून ठेवलेल्या अवस्थेत रंगेहाथ पकडले होते. सुरुवातीला आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती, मात्र त्याने तपासात सहकार्य केले नाही.
काल (६ ऑगस्ट) न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दुसऱ्या बाजूला आरोपीच्या ठाण्यातील घराची झडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांचे एक पथक ठाण्याला रवाना झाले आहे. तर आरोपीच्या दोन्ही मोबाईलचा पासवर्ड मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. आरोपी निर्मय पीडित मुलीसोबत दिघोरी येथील ज्या भाड्याच्या खोलीत सापडला होता, ती खोली पोलिसांनी तात्पुरती सील केली असून त्या ठिकाणी फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. पोलिसांना घटनेच्या दिवशी तिथून तीन धारदार चाकू, बेल्ट, गुंगी आणण्याच्या गोळ्या, लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या औषध, चिटकवणारी टेप, हातमोजे आणि इतर काही धारदार वस्तू सापडल्या होत्या.

COMMENTS