कोपरगाव : अहिल्यानगरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारणी होत असल्याने येणारा काळ नवोदित अभियंत्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीने आ

कोपरगाव : अहिल्यानगरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारणी होत असल्याने येणारा काळ नवोदित अभियंत्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीने आशादायी आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना अपयशासाठी इतरांना दोष न देता आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर भर द्यावा. शिस्त, संयम, परिश्रम आणि योग्य निर्णयक्षमतेच्या बळावर करिअर घडवावे, असे प्रतिपादन तहसीलदार महेश सावंत यांनी केले.
संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकच्या प्रथम व थेट द्वितीय वर्षातील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत ‘संजीवनी तंत्रारंभ’ कार्यक्रमाने करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंत बोलत होते. संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते. सर्कल ऑफिसर मच्छिंद्र पोकळे, प्राचार्य ए. आर. मिरीकर तसेच विविध विभागप्रमुख व अधिष्ठाता उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात अमित कोल्हे म्हणाले, ‘‘दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करण्याची संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांची दूरदृष्टी होती. अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा पुढे सुरू आहे. विद्यार्थ्यांची खरी स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी आहे. त्यामुळे दररोज स्वतःला अधिक सक्षम बनवावे. कौशल्य, सातत्य आणि जिज्ञासू वृत्ती जोपासावी.’’
संजीवनीमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासालाही प्राधान्य दिले जाते. विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांनी उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार स्वतःला तयार करावे. संजीवनीचे ३३ हजारांहून अधिक माजी विद्यार्थी ही संस्थेची मोठी ताकद असून, विविध नामांकित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवून त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घ्यावी, असे कोल्हे यांनी सांगितले.
‘‘२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या संक्रमण काळात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे केवळ पदवी मिळविण्यापेक्षा कौशल्य, नवोपक्रम, संशोधन आणि सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय साधून विकसित भारताचे सक्षम शिल्पकार बनण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे,’’ असेही त्यांनी नमूद केले.
प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी स्वागत करून संजीवनी पॉलिटेक्निकने आतापर्यंत स्थापित केलेल्या विविध कीर्तिमानांची माहिती दिली. प्रा. आय. के. सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. एम. सोनवणे यांनी आभार मानले.

COMMENTS