बीड: मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेविरोधात केलेली वक्तव्ये तातडीने थांबवावीत, अन्यथा शिवसैनिक तीव्र आंदोलन

बीड: मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेविरोधात केलेली वक्तव्ये तातडीने थांबवावीत, अन्यथा शिवसैनिक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा शिवसेना जिल्हा संघटक रतन गुजर यांनी दिला आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना गुजर यांनी, उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेविरोधात बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे असून त्याचा परिणाम स्वतःवरच होतो, अशी टीका केली. जयकुमार गोरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचे आत्मपरीक्षण करावे. वारंवार भूमिका बदलणार्यांनी उद्धव ठाकरे यांना शिकवण्याचा प्रयत्न करू नये, असेही ते म्हणाले. ज्या भाजपाचा जयकुमार गोरे यांना अभिमान आहे, त्या पक्षालाही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि छायाचित्राचा आधार घेतल्याशिवाय जनतेसमोर जाता येत नाही, असा दावा त्यांनी केला. रतन गुजर यांनी पुढे म्हटले की, मंत्री म्हणून जयकुमार गोरे यांनी आपल्या खात्यातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे, निधीचा योग्य वापर करावा आणि पक्षसंघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिवसेनेची चिंता करण्याची गरज नाही. शिवसेना आणि शिवसैनिक सक्षम आहेत. आमच्या अस्तित्वाबद्दल चिंता करण्याऐवजी स्वतःच्या कामगिरीकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले. यापुढे जयकुमार गोरे यांनी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास शिवसैनिक तीव्र आंदोलन करतील आणि त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही रतन गुजर यांनी दिला.

COMMENTS