बीड : बीड जिल्हा कारागृहातील कारभाराबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या असून, तेथील पारदर्शकता, सुरक्षा आणि नियमावलीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आह

बीड : बीड जिल्हा कारागृहातील कारभाराबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या असून, तेथील पारदर्शकता, सुरक्षा आणि नियमावलीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी दि.3 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली. गृहमंत्री अमित शाह यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती खा.सोनवणे यांनी दिली. बीड जिल्हा कारागृहात काही ठराविक बंदी (कैद्यांना) नियमांचे उल्लंघन करून विशेष सवलती व सुविधा पुरविल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यात कारागृहात मोबाईल फोन वापरण्याची मुभा देणे, बंदी घातलेल्या वस्तू उपलब्ध करून देणे तसेच इतर अवाजवी लाभ पोहोचवणे यांसारख्या गंभीर बाबींचा समावेश असल्याचे खा.सोनवणे यांनी निवेदनात नमूद केले आहे. या सर्व प्रकारात कारागृह प्रशासनातील काही अधिकार्यांची भूमिका संशयास्पद असून त्यांच्या निष्पक्षतेवर आणि कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारागृहासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे बेकायदेशीर सवलती दिल्या जात असतील, तर ते केवळ प्रशासनाच्या निष्पक्षतेवरच नव्हे, तर कायदा आणि सुव्यवस्थेवर तसेच न्यायप्रणालीवरील सामान्य जनतेच्या विश्वासावर मोठा आघात आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाकडून सविस्तर अहवाल मागवावा, तसेच एखाद्या सक्षम व स्वतंत्र प्राधिकरणामार्फत वेळेच्या मर्यादेत उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश द्यावेत, चौकशीत तक्रारी तथ्यपूर्ण आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकारी व दोषींवर कायद्यानुसार कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी केली. पारदर्शकता व निगराणी व्यवस्था: भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी राज्यातील सर्व कारागृहांमध्ये डिजिटल निगराणी, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक दिशानिर्देश जारी केले जावेत. गृहमंर्त्यांचे सकारात्मक आश्वासन: नवी दिल्लीतील या भेटीदरम्यान खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले की, बीड जिल्हा कारागृहातील हा प्रकार अत्यंत गंभीर असून यावर तत्काळ दखल घेणे आवश्यक आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या निवेदनाची गांभीर्याने नोंद घेत कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित या संवेदनशील विषयावर त्वरित व योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन खा.सोनवणे यांना दिले आहे.

COMMENTS