नवी दिल्ली: नीट (NEET) परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा

नवी दिल्ली: नीट (NEET) परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर तब्बल एक महिना आंदोलन सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, तरीही राजीनामा न मिळाल्याने अखेर पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान हिंसक चकमक उडाली असून पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, तर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे.
या दगडफेकीमध्ये अनेक सरकारी व खासगी वाहनांचे तसेच मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांना आता मोठे यश मिळाले असून, दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दिल्ली पोलिसांनी सरकारला सादर केलेल्या अंतर्गत अहवालानुसार (Internal Report), अत्याधुनिक ‘फेस रिकग्निशन तंत्रज्ञाना’च्या (Face Recognition Technology) साहाय्याने दगडफेक करणाऱ्या सर्व आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दगडफेक करणाऱ्यांपैकी बहुतेकांवर आधीपासूनच शस्त्र कायद्याचे उल्लंघन, दरोडा, खून आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ओळख पटलेल्यांपैकी तब्बल १० जणांवर थेट खुनाचे गुन्हे नोंदवलेले आहेत.
पोलीस अहवालानुसार, उपद्रवी तत्त्वांनी केवळ एकाच ठिकाणी नव्हे, तर संसदेपासून सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरात विविध ठिकाणी दगडफेक केली. यामध्ये टॉल्स्टॉय-जनपथ क्रॉसिंग, रेल्वे भवन परिसर, कॅनॉट प्लेस आणि एलआयसी बिल्डिंग परिसर या भागांचा समावेश आहे. या सर्व उपद्रवी आरोपींची अचूक ओळख पटली असून, आता पोलिसांकडून त्यांच्यावर कडक कारवाईची तयारी सुरू आहे.

COMMENTS