कीव्ह: अमेरिकेने युक्रेनला 'पेट्रिएट मिसाईल इंटरसेप्टर' तंत्रज्ञान देण्यास तसेच ते स्वतः विकसित करण्यास बंदी घातली आहे. ट्रम्प प्रशासनाने युक्रेन

कीव्ह: अमेरिकेने युक्रेनला ‘पेट्रिएट मिसाईल इंटरसेप्टर’ तंत्रज्ञान देण्यास तसेच ते स्वतः विकसित करण्यास बंदी घातली आहे. ट्रम्प प्रशासनाने युक्रेनबाबत घेतलेल्या या कठोर भूमिकेनंतर रशियाने युक्रेनवर आतापर्यंतच्या सर्वात भीषण हल्ल्यांपैकी एक मोठा हल्ला चढवला आहे. रशियाने रात्रभरात २७ बॅलिस्टिक मिसाईल डागल्या, ज्यातील केवळ एका मिसाईलला पाडण्यात युक्रेनला यश आले. उर्वरित २६ मिसाईल्सनी राजधानी कीव्हसह अनेक शहरांमध्ये मोठा विनाश घडवून आणला आहे.
या भीषण हल्ल्यात युक्रेनचे किमान ९ नागरिक मारले गेले असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत युक्रेनने देखील काळ्या समुद्रात रशियाचे ‘यानिना’ (Yanina) हे विशाल कंटेनर जहाज क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यात बुडवून मोठा बदला घेतला आहे.
पेट्रिएट मिसाईलचा तुटवडा आणि ट्रम्प यांचा यू-टर्न युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशात पेट्रिएट इंटरसेप्टर मिसाईलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचे मान्य केले आहे. नाटो शिखर परिषदेत ट्रम्प यांनी युक्रेनला हे तंत्रज्ञान विकसित करू देण्याचे संकेत दिले होते, मात्र कॅम्प डेव्हिड येथील बैठकीदरम्यान त्यांनी घुमजाव करत अतिसंवेदनशील तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होऊ शकतो असा दावा करत पुरवठ्यास नकार दिला. ट्रम्प यांच्या या निर्णयाच्या काही तासांतच रशियाने कीव्ह, सूमी, खारकीव्ह आणि पोल्टावा भागावर तुफान हल्ला चढवला.
२७ पैकी केवळ १ मिसाईल रोखण्यात यश रशियाने डागलेल्या २७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी युक्रेनला केवळ एकच मिसाईल रोखता आले. यामुळे युक्रेनची एअर डिफेन्स सिस्टीम अत्यंत कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यादरम्यान लोकांना सुरक्षित स्थळी हलवताना एका २२ वर्षीय युक्रेनियन पोलीस कर्मचाऱ्याचाही दुसऱ्या मिसाईल हल्ल्यात मृत्यू झाला.
काळ्या समुद्रात युक्रेनचा मोठा पलटवार रशियाच्या या हल्ल्यानंतर काही तासांतच युक्रेनने काळ्या समुद्रात रशियाला मोठा धक्का दिला. सुमारे एक लाख टन क्षमतेचे रशियन व्यापारी जहाज ‘यानिना’ (Yanina) युक्रेनियन सैन्याने बुडवले. रशियन अणूऊर्जा कंपनी ‘रोसाटॉम’नेही नोव्होरोसिस्क बंदरापासून १३० सागरी मैल अंतरावर नौदलाच्या दोन ड्रोन हल्ल्यांमुळे हे जहाज बुडाल्याचे मान्य केले आहे. रशियाने या हल्ल्याला ‘समुद्री चाचेगिरी’ म्हटले असले तरी, रशियन युद्धयंत्रणेला रसद पुरवणारी सर्व संसाधने आता आमच्या निशाण्यावर असतील, असा इशारा झेलेन्स्की यांनी दिला आहे.

COMMENTS