Homeताज्या बातम्या

कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील काही अटी व पात्रता निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने त्यावर पुन

शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्याचे संकेतकृषीमंत्री भरणे : तब्बल 56 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार
राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन


मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील काही अटी व पात्रता निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने त्यावर पुनर्विचार करावा, अशी सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. तसेच अलीकडील वादळी पाऊस व अवकाळी हवामानामुळे केळी व ऊस पिकांचे मोठे नुकसान झाल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी प्रश्‍न, पिकांचे नुकसान आणि विरोधी पक्षांच्या आगामी राजकीय रणनीतीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शासनाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा नसल्याचे नमूद केले; मात्र प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेता काही निकष शेतकर्‍यांसाठी अडथळा ठरत असल्याचे सांगितले. पवार म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत शासनाने जनतेशी सातत्याने संवाद साधणे आवश्यक आहे. शेतकरी संघटना आणि लाभार्थ्यांकडून येणार्‍या तक्रारींची दखल घेऊन आवश्यक ते बदल करण्याची तयारी शासनाने दाखवावी. केवळ निर्णय जाहीर करून थांबण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी कितपत परिणामकारक ठरते, याकडेही लक्ष दिले पाहिजे. कर्जमाफीच्या निकषांबाबत अनेक शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केल्याची नोंद घेत पवार यांनी या विषयावर मुख्यमंत्री तसेच केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा मानस व्यक्त केला. शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन पात्रतेच्या अटींमध्ये सुधारणा करता येईल का, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील विविध भागांत झालेल्या वादळी वार्‍यांसह अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील केळी आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या तज्ज्ञ पथकानेही नुकसान गंभीर असल्याचे निदर्शनास आणल्याचे पवार यांनी सांगितले. प्राप्त अहवालाचा सविस्तर अभ्यास करून पुढील भूमिका ठरविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. याच पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील बैठकीचाही उल्लेख करण्यात आला. देशातील राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. आगामी काळात विरोधी पक्षांनी परस्पर समन्वय वाढवून संघटनात्मक बळकटीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS