न्यू चंदीगड : भारतीय क्रिकेट संघाने न्यू चंदीगड येथे झालेल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा डावासह तब्बल 300 धावांनी पराभव करत इतिहास रचला. कसोटी

न्यू चंदीगड : भारतीय क्रिकेट संघाने न्यू चंदीगड येथे झालेल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा डावासह तब्बल 300 धावांनी पराभव करत इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमधील भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी 2018 मध्ये राजकोट येथे वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला होता. त्या विक्रमालाही या विजयाने मागे टाकले.
सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 8 बाद 564 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर अफगाणिस्तानचा पहिला डाव केवळ 152 धावांत संपुष्टात आला. त्यामुळे त्यांच्यावर पुनर्फलंदाजीची वेळ आली. मात्र दुसर्या डावातही अफगाण फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकले नाहीत. संपूर्ण संघ 112 धावांत गारद झाला आणि भारताने विक्रमी विजय आपल्या नावावर केला. या सामन्यात पदार्पण करणार्या मानव सुथारने विशेष छाप पाडली. पहिल्या डावात त्याने सहा बळी घेतले होते, तर दुसर्या डावात आणखी एक फलंदाज बाद करून त्याने सामन्यात एकूण सात बळी मिळवले. त्याच्या अचूक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानच्या फलंदाजांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दुसर्या डावात वॉशिंग्टन सुंदरने चार बळी घेत अफगाणिस्तानच्या मधल्या फळीला खिंडार पाडले. कुलदीप यादवने तीन बळी मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. मोहम्मद सिराजनेही महत्त्वाची विकेट घेत संघाला सुरुवातीचे यश मिळवून दिले. अफगाणिस्तानच्या दुसर्या डावात सेदिकुल्ला अटलने 42 धावांची झुंज दिली. मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. रहमानुल्ला गुरबाज, रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदी यांनाही भारतीय गोलंदाजांनी लवकर माघारी धाडले. सामन्याच्या तिसर्या दिवशी भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. चहापानाच्या विश्रांतीपर्यंत अफगाणिस्तानने पाच गडी गमावले होते. त्यानंतर कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आक्रमक गोलंदाजी करत उर्वरित फलंदाजांना फार काळ टिकू दिले नाही. या विजयासह भारताने कसोटी क्रिकेटमधील आपल्या यशस्वी प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. हा भारताचा एकूण 186 वा कसोटी विजय ठरला. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विजयांच्या यादीत भारताने वेस्ट इंडिजला मागे टाकले आहे. वेस्ट इंडिजच्या नावावर 185 कसोटी विजय आहेत. या यादीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ अद्याप भारताच्या पुढे आहेत. न्यू चंदीगड येथील हा विजय केवळ धावांच्या फरकामुळेच नव्हे, तर भारतीय संघाच्या सर्वांगीण कामगिरीमुळेही विशेष मानला जात आहे. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांनी अफगाणिस्तानला दोन्ही डावांत गुंडाळत भारतीय संघाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. पदार्पणातच प्रभावी कामगिरी करणारा मानव सुथार आणि अचूक गोलंदाजी करणारे वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यादव हे या ऐतिहासिक विजयाचे प्रमुख शिल्पकार ठरले.

COMMENTS