Homeताज्या बातम्या

शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्याचे संकेतकृषीमंत्री भरणे : तब्बल 56 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ

मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकर्‍यांना मिळ

नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन
कै. पिचड यांचे जलव्यवस्थापनातील योगदान उल्लेखनीय : डॉ. शिंदे
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार


मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकर्‍यांना मिळणार असल्याचे सांगितले. या योजनेसाठी राज्य शासनावर सुमारे 36 हजार 585 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असून, आवश्यक वाटल्यास कर्जमाफीच्या पात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्यास सरकार तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात कर्जमाफीच्या अटींवरून विरोधक आणि शेतकरी संघटनांकडून सातत्याने टीका होत असताना कृषिमंत्र्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सरकारने शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देत आर्थिक अडचणी असूनही मोठा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. भरणे यांनी सांगितले की, शासनाच्या कर्जमुक्ती उपक्रमामुळे राज्यातील लाखो शेतकर्‍यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जासाठी पात्र असलेल्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी प्रोत्साहनपर तरतूदही करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. कर्जमाफीच्या पात्रतेसंदर्भातील काही अटींवर विरोधकांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेक शेतकरी संघटनांनीही निकषांमुळे मोठ्या संख्येने शेतकरी वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना कृषिमंत्री म्हणाले की, प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान काही अडचणी आढळल्यास शासन त्यावर विचार करून आवश्यक बदल करण्यास तयार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या अटींबाबत फेरविचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषिमंत्र्यांनी शेतकर्‍यांना पेरणीबाबतही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. 12 ते 15 जून या कालावधीत हवामानाचा अचूक अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करावी, असे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व भागांत एकसमान पाऊस होणार नाही. विशेषतः मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने घाईघाईने पेरणी टाळावी, असे आवाहन त्यांनी केले. मे आणि जून महिन्यातील वादळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वार्‍यामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे एक लाख 40 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. जळगाव, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक घरांचेही नुकसान झाले असून, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी पंचनाम्यांचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
खतसाठा पुरेसा असल्याचा दावा
पेरणी हंगाम जवळ आल्याने खतांच्या उपलब्धतेबाबत शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना भरणे म्हणाले की, राज्यात सध्या पुरेसा खतसाठा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षांमुळे पुरवठा व्यवस्थेवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असली तरी अतिरिक्त खतपुरवठ्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफीच्या निकषावरून विरोधक आक्रमक
कर्जमाफीच्या निकषांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवार यांच्यासह विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काही अटींबाबत आक्षेप घेतला आहे. तसेच रोहित पवार यांनीही पात्रतेच्या निकषांमुळे अनेक शेतकरी वंचित राहू शकतात, असा आरोप केला आहे. यामुळे कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांची अंतिम संख्या याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS