सिंधुदुर्ग : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आह

सिंधुदुर्ग : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या वीस दिवसांत घरगणनेचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला असून, नियोजनबद्ध प्रशासन, प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा मान जिल्ह्याला मिळाला आहे.
जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने ही मोहीम यशस्वीपणे राबविली. १६ मे २०२६ रोजी सुरू झालेल्या घरगणना मोहिमेत जिल्ह्यातील आठ तहसील कार्यालये, तीन नगरपरिषदा आणि पाच नगरपंचायतींचा सहभाग होता. या मोहिमेसाठी २६० पर्यवेक्षक आणि १,४६० प्रगणकांनी काम केले. त्यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील १,४५१ घरयादी गटांची गणना निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात आली.
या यशामागे प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन, नियमित आढावा बैठका, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेले मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष क्षेत्रभेटींद्वारे अडचणींचे त्वरित निराकरण यांचा मोठा वाटा राहिला. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनीही मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने मार्गदर्शन केले. तहसीलदार, मुख्याधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनीही जबाबदारीने काम पार पाडत मोहिमेला गती दिली. घरगणनेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता माहितीची गुणवत्तापूर्ण पडताळणी आणि त्रुटी दुरुस्तीचे कामही निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
यापूर्वी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना उपक्रम राबविण्यात आला होता. या टप्प्यात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत डिजिटल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील एकूण २९ हजार ५९१ घरांची स्वगणना पूर्ण झाली. तसेच १७ गावे आणि एका नगरपंचायतीने शंभर टक्के स्वगणनेचे उद्दिष्ट गाठले. वेंगुर्ला तालुक्यातील मूठ हे गाव सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले महसुली गाव ठरले. या यशामुळे नागरिकांमध्ये वाढलेली नागरी जबाबदारीची जाणीव आणि डिजिटल साक्षरतेचा प्रभाव अधोरेखित झाला आहे.
जनगणना मोहिमेच्या यशात प्रगणक, पर्यवेक्षक आणि विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, समन्वय, समर्पण आणि सांघिक प्रयत्नांमुळेच ही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली. या यशाबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन करत पुढील टप्प्यांमध्येही याच कार्यक्षमतेने काम करण्याचे आवाहन केले.

COMMENTS