मुंबई : राज्याच्या राजकीय क्षेत्रात गेली दोन दशके चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील अंतिम निकालासाठी आणखी काही काळ प्र
मुंबई : राज्याच्या राजकीय क्षेत्रात गेली दोन दशके चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील अंतिम निकालासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. या खटल्याचा निकाल मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, निकाल लेखन आणि त्यासंबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी काही दिवसांची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २० जून रोजी निश्चित करण्यात आली आहे.

मुंबई सत्र न्यायालयात सकाळी सुनावणी सुरू होताच या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र व खासदार ओमराजे निंबाळकर हे कुटुंबीयांसह न्यायालयात उपस्थित होते. तसेच या घटनेत मृत्यू झालेले चालक समद काझी यांच्या कुटुंबीयांनीही न्यायालयात हजेरी लावली होती. मात्र निकाल जाहीर न झाल्याने दोन्ही कुटुंबीयांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
यापूर्वी १४ मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान काही आरोपींनी वैद्यकीय कारणास्तव अतिरिक्त वेळ मागितला होता, त्यानंतर न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत सुनावणी तहकूब केली होती. ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी पाठलाग करून हा हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेने राज्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. तपास यंत्रणांच्या चौकशीत ही हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा दावा करण्यात आला असून आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात हा गुन्हा घडवून आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अनेक आरोपींविरुद्ध कट रचणे, हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS