श्रीगोंदा : शारदा विद्या निकेतनच्या मुरलीधर आण्णा होनराव माध्यमिक विद्यालय व एन. एस. गुळवे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी. टी. मखरे यांच्या स

श्रीगोंदा : शारदा विद्या निकेतनच्या मुरलीधर आण्णा होनराव माध्यमिक विद्यालय व एन. एस. गुळवे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी. टी. मखरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभात त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष एकनाथ आळेकर यांनी प्राचार्य मखरे यांचे शैक्षणिक योगदान अतुलनीय असून संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.
आळेकर म्हणाले की, मखरे यांनी सेवाकाळात प्रामाणिकपणा, निष्ठा आणि समर्पण जपत संस्थेच्या विकासासाठी कार्य केले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन संस्थेला लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे खजिनदार प्रा. ज्ञानदेव गायकवाड यांनी मखरे यांनी सर्वांना सोबत घेऊन संस्थेची गुणवत्ता आणि लौकिक वाढविल्याचे सांगितले. विश्वस्त प्रा. डॉ. बाळासाहेब बळे आणि प्रा. सचिन आगळे यांनीही त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. राम सोनवणे आणि मुख्याध्यापिका संगिता वनपुरे यांनी मखरे यांच्या कार्याचा उल्लेख करत, त्यांनी बालवाडीपासून कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत सर्व घटकांना सोबत घेऊन गुणवत्तेचा आलेख उंचावल्याचे सांगितले. दरम्यान, प्राचार्य बी. टी. मखरे यांच्या सेवानिवृत्तीनंतर नयना वाळके यांनी प्राचार्यपदाची सूत्रे स्वीकारली. मखरे यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पदभार स्वीकारताना आनंदासोबतच भावनिक होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS